तरुणाईचा सेल्फी आकर्षण बिंदू भुईसपाट
बेळगाव : राजहंसगडावरील सौंदर्यात भर टाकणारे पांढऱ्या चाफ्याचे झाड पावसामुळे कोसळले. यामुळे निसर्गप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या झाडासोबत अनेकांनी फोटो काढून घेतले असून त्याच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. राजहंसगडावर सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारी पांढऱ्या चाफ्याचा एक जुनाट वृक्ष होता. या झाडाला चाफ्याची फुले लागत होती. सिद्धेश्वराच्या पूजेसाठी या फुलांचा वापर होत असायचा. अनेक चित्रपटातील गाणी तसेच अल्बममधील गाण्यांचे या झाडापाशी चित्रीकरण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच राजहंसगडाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यावेळी या झाडापाशी कंपाऊंड तयार करण्यात आले. राजहंसगडाच्या सौंदर्यात या झाडाचाही तितकाच वाटा होता. अनेकांनी या झाडासोबत छायाचित्रे काढून घेतली आहेत. बेळगावसह परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे चाफ्याचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे.









