‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल, नागरिकांतून समाधान
बेळगाव : बसवाण गल्ली कॉर्नर नरगुंदकर भावे चौकातील जुनाट पिंपळाचा वृक्ष धोकादायक स्थितीत होता. तो कधीही कोसळण्याच्या मार्गावर असल्याने ‘नरगुंदकर भावे चौकातील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत’ ने बुधवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका, हेस्कॉम आणि वनखात्याच्यावतीने तेथील धोकादायक वृक्ष अखेर बुधवारी हटविला. त्यामुळे नागरिकांतून ‘तरुण भारत’चे कौतुक केले जात आहे. नरगुंदकर भावे चौकात असलेला पिंपळाचा वृक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र अलीकडे झालेल्या अवकाळी पावसामुळे वृक्षाची मुळे जमिनीपासून तुटली आहे. तसेच झाडाचा बुंधा कलंडण्याच्या मार्गावर असून, त्या ठिकाणच्या दुकानांच्या भिंतींना तडे जात आहेत. याबाबत अनेकवेळा विनंती करून देखील धोकादायक वृक्ष हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे तरुण भारतने धोकादायक वृक्षाबाबत सचित्र वृक्ष प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या महापालिका, वनखाते आणि हेस्कॉमने तातडीने बुधवारी तेथील धोकादायक वृक्ष हटविला. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून ‘तरुण भारत’ने याबाबत आवाज उठविल्याने कौतुक होत आहे.









