वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत क्रिकेट क्षेत्रात अनेक विक्रम नोंदविले असून त्यापैकी काही विक्रम अद्याप अबादित आहेत. सचिनने वनडे क्रिकेट प्रकारात 49 शतकांचा विश्वविक्रम केला आहे. सचिनचा हा विश्वविक्रम मोडला जाईल तो माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील भावनात्मक क्षण राहिल, असे प्रतिपादन विराट कोहलीने केले आहे.
विराट कोहलीने क्रिकेटच्या वनडे प्रकारात आतापर्यंत 46 शतके नोंदविली आहेत. सचिन तेंडुलकरच्या विश्व विक्रमाशी बरोबरी करण्याकरीता कोहलीला आण्खी तीन शतकांची गरज आहे. दरम्यान, पुमा आणि डिस्ने हॉट स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या भारतीय क्रीडा क्षेत्रातील विविध लिजेंड्सच्या गोष्टी या डॉक्युमेंट्रीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रातील विराट कोहली, युवराज सिंग, एमसी मेरी कॉम, भारतीय फुटबॉल संघाचा सुनिल छेत्री, हरमनप्रीत कौर, पॅराअॅथलिट अवनी लेखरा यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाची माहिती डॉक्युमेंट्रीच्या रुपात सहा भागात तयार करण्यात आली आहे. देशातील क्रीडा चळवळीला अधिक प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळण्यासाठी सध्या क्रीडा तसेच प्रमुख शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची माहिती या डॉक्युमेंट्रीमध्ये राहिल. या डॉक्युमेंट्रीच्या एका भागामध्ये भारताचा अनुभवी आणि ज्येष्ठ फुटबॉलपटू सुनिल छेत्रीच्या कामगिरी विषयी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्री संदर्भात बोलताना कोहलीने आपल्या बालपणातील क्रिकेट संदर्भात काही आठवनींना उजाळा दिला. क्रीडा क्षेत्रामुळेच आयुष्याची खरी किंमत, शिस्त आणि नियोजन यांची माहिती आपल्याला झाली. दरम्यान, याप्रसंगी विराट कोहलीने सचिनच्या विक्रमाबाबत आपली वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.









