सलग दोन विश्वचषक पटकावल्यानं 1983 ची स्पर्धा सुरू झाली तेव्हा वेस्ट इंडिजलाच संभाव्य विजेते मानलं जात होतं, तर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडे पाहिलं जात होतं ते प्रबळ आव्हानवीर या नात्यानं…भारत स्पर्धा जिंकणं सोडाच, उपांत्य फेरीसाठी तरी पात्र ठरेल की नाही याविषयी शंका होती. परंतु कपिल देवच्या संघांनं सर्वांना तोंडघशी पाडलं…
? 9 जून : विश्वचषकात बलाढ्या वेस्ट इंडिजला प्रथमच पराभवाची चव चाखायला लावताना भारतानं विजय मिळविला तो 34 धावांनी. त्यात यशपाल शर्माच्या 89 धावा आणि रॉजर बिन्नी, रवी शास्त्राr यांच्या प्रत्येकी तीन बळींचा मोलाचा वाटा…
? 11 जून : झिम्बाब्वेला 155 वर गुंडाळल्यानंतर 5 गडी राखून विजय…
? 13 जून : स्पर्धेतील भारताचा पहिला पराभव. कपिल देवनं 5 बळी घेतले, तरी ऑस्ट्रेलियानं 320 धावांचा डोंगर उभारला. 158 वर डाव संपुष्टात आलेल्या भारतीय संघाला हा सामना 162 धावांनी गमवावा लागला…
? 15 जून : विंडीजनं व्हिव्हियन रिचर्ड्सच्या 119 धावांच्या जोरावर 9 बाद 282 धावा काढल्यानंतर भारत 216 पर्यंतच मजल मारू शकला अन् हा सामना 66 धावांनी हरला. त्यांना जबरदस्त प्रतिकार केला तो मोहिंदर अमरनाथनं (80)…
? 18 जून : कपिल देवच्या खेळीमुळं संस्मरणीय ठरलेला सामना, 5 बाद 17 अशी घसरगुंडी उडाल्यानंतर कपिलनं 175 धावा काढत एकट्यानं भारताला 266 पर्यंत नेलं. त्यानंतर झिम्बाब्वेला 235 वर गुंडाळत मिळविला 31 धावांनी विजय…
? 20 जून : भारतानं शेवटच्या गट सामन्यात 247 धावा काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 129 वर संपुष्टात आणून 118 धावांनी दणदणीत पराभव केला. ही कामगिरी करता आली ती मदन लाल, रॉजर बिन्नी यांनी घेतलेल्या प्रत्येकी चार बळींमुळं…
? 22 जून : उपांत्य सामन्यात भारतानं यजमान इंग्लंडला आरामात नमविलं. आधी इंग्लंडला दडपणाखाली आणून 213 धावांवर गुंडाळण्यात कपिल देवच्या 3 बळींनी मोठी भूमिका बजावली. त्यानंतर यशपाल शर्माच्या 61 धावांच्या जोरावर सहा गडी राखून सामना जिंकत भारतानं अंतिम फेरीत धडक दिली…
? 25 जून : भारतानं अभूतपूर्व कामगिरी करताना वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं…प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय संघ केवळ 183 धावांत गारद झाला होता. त्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिलं ते फक्त के. श्रीकांतचं (38)…त्यानंतर बलविंदर संधूच्या जादुई चेंडूनं ग्रिनीजचा त्रिफळा उडविला, पण खरा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला तो रिचर्ड्सचा चुकलेला हूक कपिल देवच्या हातात जाणं. मोहिंदर अमरनाथ, मदन लाल यांनी प्रत्येकी तीन बळी घेत विंडीजला अवघ्या 140 वर कोसळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अन् भारतानं इतिहास रचला !









