खोटे पुरावे दिल्याच्या आरोपावरून कारवाई : 10 दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशभरात खळबळ उडवून दिलेल्या कर्नाटकातील धर्मस्थळमधील कथित शेकडो मृतदेह दफन प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. मृतदेह पुरल्याची तक्रार देणाऱ्या ‘मास्क मॅन’ला एसआयटीच्या पथकाने शनिवारी अटक केली. सी. एन. चिन्नय्या उर्फ चेन्ना असे आरोपीचे नाव आहे. दिशाभूल करणे आणि खोटे जबाब दिल्याच्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला मंगळूर जिल्ह्याच्या बेळतंगडी न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांसाठी एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले आहे.
धर्मस्थळमधील मंजुनाथ स्वामी मंदिरात एकेकाळी सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या चिन्नय्या याने आपण दोन दशकांच्या कालावधीत धर्मस्थळ परिसरात शेकडो मृतदेह दफन केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्याने काही मानवी कवट्याही सादर केल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डीजीपी प्रणब मोहंती यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी स्थापन केली होती. या प्रकरणामुळे राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले होते.
आरोपी सी. एन. चिन्नय्या याने दाखविलेल्या 17 ठिकाणी एसआयटीच्या पथकाने उत्खनन केले. दोन ठिकाणी मानवी सांगाड्यांचे अवशेष वगळता काहीही हाती लागले नव्हते. त्यामुळे दोन आठवड्यांपासून सुरू असलेले उत्खनन कार्य एसआयटीने मागील आठवड्यात स्थगित केले होते. तसेच चिन्नय्याची कसून चौकशी केली. त्याने नोंदविलेल्या जबाबात आणि केलेल्या तक्रारीत बऱ्याच विसंगती आढळून आल्यानंतर खोटे पुरावे दिल्याच्या आरोपावरून शनिवारी त्याला एसआयटीने अटक केली. तपासावेळी गुप्तता राखण्यासाठी एसआयटीने चिन्नयाची ओळख लपविण्यासाठी त्याच्या चेहऱ्याला मास्क वापरण्याची व्यवस्था केली होती. शुक्रवारी दुपारपासून सलग 19 तास चौकशी केल्यानंतर त्याला एसआयटीने अटक केली. त्यापाठोपाठ त्याचे नाव व फोटो उघड केले आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दुपारी चिन्नय्याला बेळतंगडी येथील प्रथमश्रेणी मॅजिस्ट्रेट विजयेंद्र यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी अधिक चौकशीसाठी त्याला 10 दिवसांची एसआयटी कोठडी दिली. तत्पूर्वी त्याची बेळतंगडी तालुका रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अधिक चौकशीसाठी चिनय्याला उजीरे, धर्मस्थळ, बेळतंगडीसह आजूबाजूच्या परिसरात नेण्यात येण्याची शक्यता आहे, त्याने मृतदेह दफनाची तक्रार करण्याची कारणे कोणती?, त्याच्यामागे आणखी किती जण सामील आहेत?, याचाही तपास केला जाणार आहे.
कोण आहे चिन्नय्या?
धर्मस्थळ प्रकरणात इतके दिवस मास्क मॅन म्हणून ओळखला गेलेला आरोपी चिन्नय्या हा मंड्या जिल्ह्यातील चिक्कबळ्ळी येथील रहिवासी आहे. धर्मस्थळ परिसरात निर्माण झालेल्या वादाचा केंद्रबिंदू तोच होता. त्याने सुरुवातीला मंड्या जिल्ह्यातील हल्लेगेरे पंचायतीमध्ये काम केले होते. नंतर वीट भट्टीतही कामाला होता. मागील 25 वर्षांपूर्वी तो धर्मस्थळमध्ये आला. तेथे स्वच्छतेचे काम करत होता. त्यावेळी कर्णफुले चोरीप्रकरणानंतर त्याला तेथून पिटाळून लावण्यात आले होते. त्यानंतर आपल्या मूळ गावी, तामिळनाडूतील इरोड जिल्ह्यातही वास्तव्य केल्याचे त्याने सांगितले आहे. तेथून उजीरे येथे पंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून त्याने काम केल्याचे समजते. नदीत बुडालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवरील सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
अहवाल आल्यानंतर सत्यता उघड
धर्मस्थळमधील कथित मृतदेह दफन प्रकरणासंबंधी एसआयटीने अहवाल दिल्यानंतर सत्यता उघडकीस येईल. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही तपास सुरू केला. त्याला आता अटक करण्यात आली आहे. त्याच्या जबाबावरून पुढील तपास सुरू ठेवला जाणार आहे.
-डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री
मी नामधारी, सूत्रधार वेगळेच!
मी नामधारी आहे. मात्र, सूत्रधार वेगळे आहेत, असे वक्तव्य चिन्नय्या याने केले आहे. मला धमकावण्यात आले. मला मानवी कवट्या देऊन न्यायालयात नेण्यास सांगण्यात आले होते. न्यायालयात नेलेल्या कवट्या कोठून आल्या, हे मला माहित नाही, असेही त्याने सांगितले आहे.









