लोकशाहीमार्गाने लढणाऱ्या समिती नेते-कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्यादिनी लोकशाहीमार्गाने लढा दिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायकल फेरीत भाग घेतलेल्या 1 हजार ते 1500 जणांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईने सीमाभागातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी स्वत: सरकारतर्फे फिर्याद दिली असून भादंवि 143, 153ए, 290, 149 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सुमारे दीड हजार जणांवर एफआयआर दाखल झाला असून यापैकी 18 जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमविणे, दोन भाषिकांत तेढ निर्माण करणे आदी कलमांखाली मराठी नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला सुरुवात झाली होती. सायकल फेरीत भाग घेतलेल्या नेते-कार्यकर्त्यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे. सायकल फेरीच्या माध्यमातून कर्नाटक सरकारच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्याचा ठपका आपल्या न्याय्य मागणीसाठी लोकशाहीमार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाजूने घोषणा देऊन सामाजिक सलोख्याचा भंग केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सीमाभागात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एफआयआरमधील नोंद नावे
मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, सारिका पाटील, रणजित चव्हाण-पाटील, अॅड. अमर येळ्ळूरकर, अंकुश केसरकर, रवी साळुंखे, वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, सरिता पाटील, सरस्वती पाटील, विकास कलघटगी व इतर.









