नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण : पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान : बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर/किणये
राकसकोप भागात रविवारी रात्री काही शेतकऱ्यांना हत्ती दिसला. या हत्तीने शिवारातील पिकांचे नुकसान केले. यामुळे शेतकरी भयभीत झाले होते. रविवारी रात्री या गावातील नागरिकांनी सदर हत्तीला हुसकावून लावले होते. सदर हत्ती बिजगर्णी, सोनोली शिवारात गेला असल्याची चर्चा होती. आता याच हत्तीने आपला मोर्चा कर्ले शिवाराकडे वळविला आहे. मंगळवारी सकाळी कर्ले शिवारात सदर हत्तीच्या पायाचे ठसे शेतकऱ्यांना दिसले. हत्तीच्या पायाचे ठसे शेतातील बटाटा, रताळी व कोथिंबीर या पिकांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत. सदर हत्ती मंगळवारी पहाटेच्या दरम्यान आला असावा अशी चर्चा या गावामध्ये सध्या सुरू आहे.
कारण सोमवारी रात्री काही शेतकरी या शिवारामध्ये फेरफटका मारत होते. त्यांच्या निदर्शनास हत्ती आला नव्हता. त्यामुळे हा हत्ती नक्कीच मंगळवारी पहाटे या शिवारात आला असावा असे शेतकरी सांगत आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान राकसकोप येथील एका शेतकऱ्याला दुचाकीवरून जाताना राकसकोप नाल्याजवळील रस्त्यावरून हत्ती जात असताना त्याच्या निदर्शनास आले होता. त्याने लागलीच नागरिकांना याची माहिती दिली. त्यावेळी गावातील नागरिकांनी सदर हत्तीला गुऊवाळ शिवारात हुसकावून लावले. हा राकसकोप भागातील मिरची, बटाटा, ऊस रताळी आदी पिकांचे या हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्ती रविवारी रात्री यळेबैल, सोनोली व बिजगर्णी शिवारात गेला अशी माहिती राकसकोप भागातील शेतकऱ्यांनी दिली होती. सदर हत्ती सोमवारी दिवसभर कोणाच्याही निदर्शनास आला नाही. सोमवारी रात्री मात्र हत्ती शेत शिवारात फिरत होता असे काही जणांनी सांगितले.
वनखात्याचे दुर्लक्ष
वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा एखाद्या शेतकऱ्याचा बळी गेल्यावर सदर अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सदर हत्तीचा बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे.
-विजय पाटील










