गांधी परिवार हीच काँग्रेसची खरी शक्ती
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष संबोधिणारे खासदार शशी थरूर यांनी आता स्वत:च्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. पक्षाबद्दल मी असे काहीच बोललो नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा थरूर यांनी बुधवारी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत केला आहे.
एका खासगी कार्यक्रमात केलेले वक्तव्य हे काही अधिकृत नव्हते. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. नेहरू/गांधी परिवाराचा डीएनए काँग्रेस पक्षासोबत अतूट स्वरुपात जोडलेला आहे. गांधी कुटुंब हीच पक्षाची शक्यती आहे. राहुल गांधी हे पक्षाचे सर्वात पसंतीचे नेते आहेत याबद्दल कुठलाच संशय नसल्याचे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
काँग्रेस खासदार थरूर यांनी तिरुअनंतपुरम येथे एका टेक कंपनीच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने विजय मिळविल्यास काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानपदाचा दावेदार कोण असेल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. थरूर यांनी याच्या उत्तरादाखल अमेरिकेतील संसदीय निवडणूक प्रक्रियेचे उदाहरण दिले होते.
अमेरिकेत मतदार प्रायमरीच्या माध्यमातून एक उमेदवार निवडतात, मग अध्यक्षीय निवडणुकीत तो उमेदवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवितो. भारतात कुणाला पंतप्रधानपदाचा उमेदवार करावे हे पक्ष ठरवतो. काँग्रेस पक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करू शकतो. काँग्रेस हा अनेकार्थाने घराणेशाहीने चालणारा पक्ष आहे. परंतु खर्गे हे पंतप्रधान झाल्यास ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान ठरतील असे थरूर यांनी म्हटले होते.









