वृत्तसंस्था /सिंगापूर
सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे माजी मंत्री थरमन षणमुगरत्नम यांनी देशाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी स्वत:च्या प्रचारमोहिमेची सुरुवात केली आहे. सिंगापूरच्या संस्कृतीला जगात चमकणाऱ्या स्थानात कायम राखण्याचा संकल्प थरमन यांनी यावेळी व्यक्त केला. 66 वर्षीय थरमन यांनी महिन्याभरापूर्वी सक्रीय राजकारणातून हटण्याची घोषणा केली होती. परंतु आता त्यांनी स्वत:ची प्रचारमोहीम सुरू केली.. सिंगापूरची संस्कृती, आमचे काही मापदंड आणि परस्परांसोबत मिळून काम करण्याच्या पद्धतीला विकसित करण्याच्या आवश्यकतेला अत्यंत दृढतेने जाणून असल्यानेच मी या पदाच्या शर्यतीत सामील झाल्याचे थरमन यांनी म्हटले आहे. सिंगापूरमध्ये राष्ट्रपती निवडणूक सप्टेंबरमध्ये होणार आहे. राष्ट्रपती हलीमा याकूब यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 13 सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. थरमन यांनी जागतिक तसेच देशांतर्गत स्तरावर सिंगापूरसमोर असलेल्या आव्हानांचा उल्लेख केला आहे. देशासमोर सर्वात मोठे आव्हान समाजातील विभाजन रोखणे आहे. राजकारणातील 22 वर्षांच्या अनुभवामुळे लोकांना एकजूट ठेवण्यास मी पूर्णपणे सक्षम असल्याचे षणमुगरत्नम यांनी म्हटले आहे.
षणमुगरत्नम यांची पार्श्वभूमी
2011 मध्ये राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी थरमन हे अर्थतज्ञ आणि सिंगापूरच्या पतधोरण प्राधिकरणात कार्यरत होते. शिक्षण अन् अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2011-19 दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान होते. थरमन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आर्थिक मंच आणि संयुक्त राष्ट्रसंघासमवेत अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये प्रमुख पदांवर काम केले आहे.









