वृत्तसंस्था /सिंगापूर
भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षणमुगरत्नम यांनी गुरुवारी सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. षणमुगरत्नम हे सिंगापूरचे नववे राष्ट्रपती झाले आहेत. 154 जुना महाल इस्तानामध्ये हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतीय वंशाचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन यांनी षणमुगरत्नम यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली आहे. इस्ताना हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान अन् कार्यालय आहे. इस्तानामध्ये आयोजित शपथविधी सोहळ्याकरता पंतप्रधान ली सीन लूंग यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते. 66 वर्षीय षणमुगरत्नम यांनी हलीमा याकूब यांची जागा घेतली आहे. हलीमा याकूब या सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि 13 सप्टेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. 2001 साली राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या षणमुगरत्नम यांनी 1 सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्वात अधिक 70.4 टक्के मते प्राप्त केली होती. या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाचे उमेदवार एनजी कोक सॉन्ग आणि टॅन किन लियान यांच्यावर मात केली होती. एनजी कोक सॉन्ग यांना केवळ 15.72 टक्के तर टॅन किन लियान यांना 13.88 टक्के मते मिळाली होती. राजकारणात येण्यापूर्वी षणमुगरत्नम हे अर्थतज्ञ म्हणून कार्यरत होते. तसेच सिंगापूरच्या पतधोरण विषयक प्राधिकरणाशी ते जोडलेले होते. याचबरोबर 2011-19 पर्यंत त्यांनी उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली आहे.









