पंतप्रधान पोहोचले भारत मंडपममधील आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटर कक्षात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेच्या समारोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी प्रगती मैदानातील भारत मंडपमच्या आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पोहोचले. मीडिया सेंटरमध्ये फिरत असताना, पंतप्रधान मोदींनी हस्तांदोलन करत जगभरातील पत्रकारांना अभिवादन केले. फिरताना त्यांनी काही पत्रकार आणि छायाचित्रकारांशी हस्तांदोलनही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या भारत मंडपम येथील आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरला सायंकाळच्या सुमारास भेट दिली. अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी इंटरनॅशनल मीडिया सेंटरमध्ये पोहोचले. पंतप्रधान मोदींचे मीडिया सेंटरमध्ये अचानक आगमन झाल्यामुळे तेथे उपस्थित पत्रकारांमध्ये आनंदासोबतच आश्चर्यही पसरले. देश-विदेशातील विविध वृत्तपत्र आणि टीव्ही वाहिन्यांचे पत्रकार येथे उपस्थित होते. शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील सर्वच देशांनी या आंतरराष्ट्रीय संमेलनाचे विस्तृत कव्हरेज आपल्या माध्यमांना पुरविले आहे. दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबरमध्ये जी-20 व्हर्च्युअल शिखर परिषद घेण्याचे सुचवत अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवले आहे.









