घटप्रभेच्या उजव्या-डाव्या कालव्यांतून पाणी पुरवठ्याबद्दल समाधान
बेळगाव : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे अनेक तालुक्यामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेकडून घटप्रभा नदीच्या कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उजव्या व डाव्या कालव्यातून 1700 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले. जिल्ह्dयातील बेळगाव व खानापूर तालुका वगळता बहुतांश तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतवाडीसह जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्येही पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी समस्या असणाऱ्या तालुक्यामध्ये पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. त्यानुसार घटप्रभा नदीवर असणाऱ्या उजव्या व डाव्या कालव्यांतून पाणी सोडण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना मोठा लाभ
यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना व शेतीलाही पाणी उपलब्ध झाले आहे. भविष्यात पाऊस न झाल्यास पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. याची दखल घेऊन पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग करण्यात येईल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाण्याची सोय केली आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांची भेट घेऊन आभार मानले.









