विरोधी पक्षांची आघाडी नेतृत्व परिवर्तनाच्या दिशेने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या आघाडीत सध्या काँग्रेस विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त होत आहे. आघाडीचे नेतृत्व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी या आघाडीतल्या अनेक पक्षांनी केली असून समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पक्ष यांनी काँग्रेसशी विचारविनिमय न करताच ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला आहे.
बुधवारी ममता बॅनर्जी यांनी या पाठिंब्यासाठी मित्र पक्षांचे आभार मानले आहेत. आपण माझे समर्थक केले आहे. त्यासाठी मी आपले मन:पूर्वक आभार मानते, असे वक्तव्य त्यांनी केले. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनीही ममता बॅनर्जींचे गुणवर्णन केले आहे. त्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्यासाठी उत्सुक आहेत, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसवर टीका
हरियणा आणि महाराष्ट्र या महत्वाच्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभवर करण्याचे प्रमुख उत्तरदायित्व काँग्रेसवर होते. पण हे उत्तरदायित्व निभावण्यात काँग्रेसला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना नेतृत्व ममता बॅनर्जींकडे देण्याची इच्छा आहे. ममता बॅनर्जी या आघाडीचा चेहरा बनण्यास योग्य आहेत, असे त्यांचे मत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र येथील विधानसभा निवडणुका आणि सहा महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक यांमध्ये आपला पराभव का झाला, यावर काँग्रेसने आत्मचिंतन करावे, अशी सूचना कुणाल घोष यांनी बुधवारी केली.
दुहेरी उत्तरदायित्वासाठी सज्ज
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व असे दुहेरी उत्तरदायित्व सांभाळण्यास आपण सज्ज आहोत, असे विधान ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यापूर्वीपासूनच विरोधी आघाडीत काँग्रेसविरोधात धुसफूस सुरु झाली होती. आघाडीचा धर्म काँग्रेस पाळत नाही अशी तक्रार अनेक मित्र पक्षांनी केली होती. काँग्रेससंबंधी असमाधान व्यक्त केले जात होते.
वायएसआर काँग्रेसचाही पाठिंबा
आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस या पक्षानेही ममता बॅनर्जी यांना अनपेक्षितरित्या पाठिंबा दिला आहे. वास्तविक हा पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीत समाविष्ट झालेला नाही. तथापि, ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यास आमचा विरोध नाही. त्यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी. त्या विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यास सर्वात योग्य नेत्या आहेत, असे या पक्षाचे प्रतिपादन आहे.
बॅनर्जींचा अनुभव मोठा
भारतातील एका मोठ्या राज्याचे प्रशासन त्या सांभाळत आहेत. तसेच पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्येही अनेक विभाग हाताळलेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे. असाच अनुभवी नेता आज विरोधी आघाडीला आवश्यक आहे, असे वायएसआर काँग्रेसचे म्हणणे आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनीही ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली आहे. काँग्रेस हा भारतातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे हे खरे असले तरी बिगर काँग्रेस नेत्याकडे नेतृत्व दिल्यास आमचा पाठिंबा राहील असे या गटाने स्पष्ट केले. अशा प्रकारे नेतृत्वपरिवर्तनासाठी पार्श्वभूमी तयार केली जात आहे. पण परिवर्तन नेमके केव्हा होणार ही बाब अद्याप स्पष्ट नाही.
काँग्रेसचे नेमके स्थान काय?
काँग्रेस हा विरोधी पक्षांच्या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे, हे आकडेवारीवरुन निर्विवादपणे स्पष्ट होते. सध्या विरोधी आघाडीचे नेतृत्व या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे. काँग्रेस हे स्थान सोडण्यास सहजासहजी राजी होईल काय, हा प्रश्न असून हा पक्ष तयार झाला नाही तर इतर पक्ष काय करणार, हाही राजकीय वर्तुळात औत्सुक्याचा मुद्दा बनला आहे. पद सोडण्याची सक्ती काँग्रेसवर केली जाईल काय? अशी सक्ती या पक्षाने झुगारली तर पुढे काय केले जाईल, असे अनेक प्रश्न असल्याने त्वरित हालचाली होण्याची शक्यता नाही, असे अनेक राजकीय तज्ञांचे म्हणणे असल्याचे दिसते.









