दहशतवाद विरोधात शून्य सहिष्णूतेचे फ्रान्सचे धोरण
वृत्तसंस्था/ पॅरिस
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दृढ समर्थन दर्शविल्याबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी फ्रान्सचे आभार मानले आहेत. तसेच दहशतवाद विरोधात शून्य सहिष्णूतेच्या दोन्ही देशांच्या संयुक्त प्रतिबद्धतेवर त्यांनी जोर दिला आहे.
गोयल हे 1-5 जूनपर्यंत फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यावर आहेत. पहिले तीन दिवस ते फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. दहशतवाद विरोधात लढण्याच्या प्रयत्नांवर भारत आणि फ्रान्सदरम्यान असलेल्या समान धारणेला त्यांनी अधोरेखित केले आहे. फ्रान्सचे लोक आणि सरकार देखील भारताप्रमाणेच दहशतवाद विरोधात शून्य सहिष्णुता बाळगून आहेत. अलिकडेच भारताचा दौरा करणाऱ्या फ्रान्सच्या सिनेटच्या शिष्टमंडळाने भारताच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन केले होते. जेव्हा आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवाद विरोधात लढत आहोत तेव्हा जग आमच्यासाब्sात असल्याचा विश्वास या शिष्टमंडळाने आम्हाला दिला असल्याचे उद्गार गोयल यांनी काढले आहेत.
पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख
केंद्रीय मंत्री गोयल यांनी 2015 मधील पॅरिस दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवादावर दोन्ही देशांच्या अनुभवांदरम्यान समानता असल्याचे म्हटले आहे. फ्रान्सचे लोक आणि सरकार भारताचा संताप समजू शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.









