शहरातील शाखांचे उद्घाटन, शिवसैनिकांशी संवाद साधणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवसेनेचे नेते धर्मवीर (कै.) आनंद दिघे (Dharmveer Anand Dighe) यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हा शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) 3 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन होणार असून ते शिवसैनिकांशीही संवाद साधणार आहेत. ही माहिती शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकाव्दारे दिली.
राज्यात सत्तांतरानंतर ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुखपदाची जबाबदारी केदार दिघे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघेंचे खरे वारसदार केदार दिघे यांची ओळख आहे. 50 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून भाजपबरोबर सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केदार दिघे यांनी समाचार घेतला आहे. कोल्हापूर दौऱ्यात ते काय बोलणार याकडेही शिवसैनिकांचे लक्ष आहे. दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यात शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दूधवडकर यांचा शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार 3 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता दिघेंच्या उपस्थितीत कार्यक्रमांना सुरूवात होईल. यावेळी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन इंगवले यांनी केले आहे.