भारतात 550 उमेदवारांचा शोध ः संरक्षण, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्समधील संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी थेल्स आगामी काळामध्ये जागतिक स्तरावर सुमारे 12000 जणांची भरती करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये भारतामध्ये 550 जणांना भरती करून घेतले जाणार असल्याचेही समजते.
हवाई तळ, संरक्षण व सुरक्षा तसेच डिजिटल सुरक्षिततेच्या क्षेत्रात कार्यरत कंपनीला आगामी काळामध्ये विकास साधायचा असून याकरिताच आगामी काळामध्ये नव्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये बेंगळूरु आणि नोएडा या भारतातील दोन ठिकाणी कंपनी 550 जणांना भरती करून घेणार आहे.
कोणत्या देशातून किती उमेदवार
जागतिक स्तरावर कंपनीच्या समूहाकडून जवळपास 12000 जणांना भरती करून घेतले जाणार आहे, ज्यामध्ये फ्रान्समधून 5500, इंग्लंडमधून 1050, ऑस्ट्रेलियातून 600 आणि अमेरिकेतून 540 जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कंपनी भारतामध्ये अभियांत्रिकी प्रणालीअंतर्गत उमेदवारांची भरती करणार असून यात हार्डवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, सिस्टीम आर्किटेक्ट, डिजिटल तंत्रज्ञानातले तंत्रज्ञ आणि प्रोजेक्ट मॅनेजर्स यांचा समावेश असणार आहे.
कधीपासून भारतात
थेल्स ही कंपनी 1953 पासून भारतामध्ये कार्यरत आहे जिचे नोएडामध्ये मुख्य कार्यालय आहे. दिल्ली, हैदराबाद, बंगळूर आणि मुंबई या ठिकाणीही सुमारे 2000 कर्मचारी संयुक्त भागीदारीतून कंपनीकरता काम करत आहेत.









