तामिळनाडूत नव्या पक्षाची घोषणा : तमिझगा वेत्रि कषगम असणार नाव
वृत्तसंस्था/ चेन्नई
देशाच्या राजकारणात आणखी एका सुपरस्टारचा प्रवेश झाला आहे. रजनीकांत, कमल हासन यांच्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार विजयने राजकारणात पाऊल ठेवले आहे. थलापति विजयने शुक्रवारी स्वत:च्या पक्षाची घोषणा केली आहे. ‘तमिझगा वेत्रि कषगम:’ असे या पक्षाचे नाव असणार आहे. माझ्या पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणी झाली आहे. माझा पक्ष 2026 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा थलापति विजयने केली आहे.
पक्षाची नोंदणी करण्यात आली असून पक्षाच्या सामान्य कार्यकारिणीने आणि कार्यकारिणी समितीने 2024 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा आणि कुठल्याही पक्षाला समर्थन न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विजय यांच्याकडून सांगण्यात आले. मला एक भ्रष्टाचारमुक्त, धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिवादी सरकार स्थापन करायचे आहे. धार्मिक भेदभाव, जातीय दंगली आणि भ्रष्टाचारावर चालणारे राजकारण संपवायचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
विजय यांचे पूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. 22 जून 1974 रोजी जन्मलेले विजय हे एक दिग्गज अभिनेते, पार्श्वगायक आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीत विजय हे मोठे नाव आहे. तमिळसोबत अनेक भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. स्वत:च्या चाहत्यांमध्ये विजय यांची ‘थलापति’ (कमांडर) अशी ओळख आहे. विजय हे तमिळ चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन स्वीकारणारे अभिनेते असून जगभरात त्यांचे चाहते आहेत.
49 वर्षीय अभिनेता हा राज्यातील राजकीय नेत्यांच्या तुलनेत कमी वयाचा आहे. द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन (46 वर्षे) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (38 वर्षे) यासारख्या युवा राजकीय नेत्यांच्या ग्रूपमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. मागील महिन्यात चेन्नईतील एका विद्यार्थी सभेत विजय यांनी भाग घेतला होता. स्वत:च्या आईवडिलांना राजकीय नेत्यांकडून मतांच्या बदल्यात रोख रक्कम न स्वीकारण्यास सांगा असे विजय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले होते. तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार ई.व्ही. रामासामी आणि के. कामराज यासारख्या नेत्यांविषयी वाचा आणि त्यावर व्यापक चर्चा करा असे विजय यांनी नमूद केले होते.
तमिळ चित्रपटसृष्टीचा स्टार
थलापति विजय यांची तामिळनाडूत मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्याला अनेकदा गरजू लोकांची मदत करताना पाहिले जाते. डिसेंबर महिन्यात विजय यांनी थूथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यांमधील पूरगस्त लोकांना मदत केली होती. थलापति विजय हे लोकांना मोफत भोजन, शैक्षणिक शिष्यवृत्ती, कोचिंग क्लास आणि कायदेशीर मदत करत असतात.
अभिनयातून ब्रेक
राजकारणात पूर्णपणे वेळ देणे आवश्यक असल्याचे ध्यानात घेत विजयने अभिनयाच्या क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेले चित्रिकरण पूर्ण करत तो चित्रपटविश्वातून ब्रेक घेणर आहे. विजय हा सध्या वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील शेवटचा चित्रपट असेल असे त्याच्या निवेदनातून समोर येत आहे.