सराफ शिल्ड 15 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : द बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित सराफ शिल्ड 15 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून एम. व्ही. हेरवाडकरने ज्ञान प्रबोधन संघाचा 27 धावांनी तर ठळकवाडी संघाने लिटल स्वॉलर संघाचा 10 गड्यांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. लक्ष्य खतायत-हेरवाडकर, विजय बस्तवाडकर-ठळकवाडी यांना ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 146 धावा केल्या.
त्यात लक्ष्य खतायतने 2 षटकार 6 चौकारासह 72, सुजल इटगीने 2 चौकारांसह 40 इतर आदित्यने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे अद्वैत भाटे व आयुष आजगावरकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्ञानप्रबोधन संघाचा डाव 19 षटकात 117 धावांत आटोपला. त्यात अविनाश पाटीलने 4 चौकारांसह 26, अद्वैत भाटेने 3 चौकारांसह 23 तर मंथन एस.ने 17 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात लिटल स्वॉलरने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात सर्वगडी बाद 74 धावा केल्या. त्यात प्रितमने 26, राज पवारने 14 तर अथर्वने 10 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे विराज बस्तवाडकरने 15 धावांत 3, वेदांत पोटेने 15 धावांत 2 तर साईनाथ व ज्ञानेश्वर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 8.2 षटकात बिनबाद 75 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला.
शुक्रवारी उपांत्य फेरीचे सामने
- एम. व्ही. हेरवाडकर वि. लवडेल स. 9 वाजता
- ठळकवाडी वि. केएलई इंटरनॅशनल दु. 1 वाजता









