वृत्तसंस्था/ विझाक
2025 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने तामिळ थलैवाजचा 37-28 अशा नऊ गुणाच्या फरकाने पराभव केला. गुजरात टायटन्स संघाची बचावफळी अत्यंत भक्कम असल्याने तामिळ थलैवाजला चढायांवर अधिक गुण घेता आले नाहीत. या सामन्यात नितीन पनवरने 5, राकेश आणि मोहमेदरेझा शादलोई यांनी प्रत्येकी 6 गुण घेतले.
तामिळ थलैवाज संघातील अर्जुन देशवाल आणि पवन सेहरावत यांनी आक्रमक खेळ केला पण गुजरात टायटन्सच्या बचावफळीची कामगिरी भक्कम झाल्याने त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत गुजरात टायटन्सने तामिळ थलैवाजवर 10-7 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरापर्यंत गुजरात टायटन्सने तामिळ थलैवाजवर 17-12 अशी बढत घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात अर्जुन देशवालच्या चढाईवर गुजरात टायटन्स ऑलआऊट झाले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना तामिळ थलैवाजने गुजरातवर 24-21 अशी 3 गुणांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर शादलोईच्या आक्रमक खेळाने तामिळ थलैवाजचे सर्वगडी बाद झाले आणि गुजरात टायटन्सने ही लढत 37-28 अशा 9 गुणांच्या फरकाने जिंकली.









