वृत्तसंस्था / बँकॉक
थायलंडचे देशनेते स्रेट्टा थविसिन यांना पदच्युत करण्यात आले आहे. त्यांना या देशातील घटना न्यायालयाने पदावरुन हटविले आहे. एका कॅबिनेट मंत्र्याच्या नियुक्तीसंदर्भात त्यांनी घटनाभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. स्रेट्टा यांनी ही नियुक्ती करताना घटनेने निर्धारित केलेल्या औचित्य नियमांचा भंग केला असे न्यायालयाने निर्णय पत्रात स्पष्ट केले आहे. याच न्यायालयाने गेल्या आठवड्यात तेथील विरोधी पक्षही भंग केला होता.
थायलंडमधील घटनापीठाने मंत्रिमंडळातील या नियुक्तीचा संदर्भ स्पष्ट केलेला नाही. तथापि, ती करत असताना घटनेचे नियम पाळण्यात आलेले नाहीत, असा अभिप्राय व्यक्त केला आहे. हा निर्णय 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 5 विरुद्ध 4 असा बहुमताने दिला आहे. स्रेट्टा यांनी मंत्रिमंडळात नियुक्ती करताना एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या वकीलाची निवड केली. हा घटनाभंग आहे, असे बहुमताच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
विरोधी पक्षाचाही भंग
थायलंडच्या घटना न्यायालयाने गेल्या आठवड्यात थायलंडच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या विरोधातही निर्णय दिला होता. त्यामुळे या मूव्ह फॉरवर्ड नामक पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले होते. या पक्षाच्या माजी प्रमुखावर 10 वर्षे राजकारणात भाग न घेण्याचा आदेशही लागू करण्यात आला होता. अशा प्रकारे या देशातील घटना न्यायालयाने सत्ताधारी आणि विरोधी अशा दोघानांही दणका दिला आहे.
नेत्याकडून स्वीकार
थायलंडचे नेते स्रेट्टा थविसिन यांनी घटना न्यायालयाच्या निर्णयाचा स्वीकार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. देशाच्या घटनेचा सर्वांनी आदर केला पाहिजे. आपल्याला हा निर्णय मान्य असून त्याला अनुसरुन आपण त्यागपत्र सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नवे राष्ट्रप्रमुख नेमण्याच्या हालचाली या देशात केल्या जात आहेत. या न्यायालयीन निर्णयाकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते.









