वृत्तसंस्था/ बँकॉक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या थायलंड खुल्या सुपर 500 दर्जाच्या पुरूष आणि महिला आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पुरूष दुहेरीतील भारताची अव्वल जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करुन विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.
जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची टॉप सिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. मात्र 2024 च्या बॅडमिंटन हंगामात झालेल्या थॉमस चषक पुरूषांच्या सांघिक टेनिस स्पर्धेत इंडोनेशिया आणि चीनच्या बॅडमिंटनपटूंकडून सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या जोडीकडून सदर स्पर्धेमध्ये त्यांच्या कारकिर्दीला साजेसा दर्जेदार खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांच्या बॅडमिंटन दर्जामध्ये थोडी घसरण झाल्याचे जाणवले.
मंगळवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांची सलामीची लढत मलेशियाच्या नूर अझरिन आणि तेन किआँग यांच्याशी होत आहे. पुरूष एकेरीतील भारताचा टॉप सिडेड बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयला सूर मिळविण्यासाठी झगडावे लागले. प्रणॉयने विश्व चॅम्पियनशिप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. मध्यंतरी प्रणॉयला तंदुरुस्तीच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. पुरूष दुहेरीमध्ये किरण जॉर्ज आणि सतीशकुमार करुणकरण ही जोडी भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. बँकॉक स्पर्धेत पी. व्ही. सिंधू सहभागी होणार नाही. तिच्या गैरहजेरीत अस्मिता चलिहा, मालविका बनसोड आणि आकर्षि कश्यप यांच्यावर प्रामुख्याने महिला विभागाची भिस्त राहिल. मिश्र दुहेरीत तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. महिला दुहेरीत उन्नती हुडा आणि इमाद फारुखी समिया भारताचे प्रतिनिधीत्व करतील.









