प्रादेशिक राजकारणात महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे हे दोन ब्रँड आहेत असे मानले जाते. शरद पवार यांचा राजकीय प्रवास दीर्घ आणि सत्ताकेंद्रित राहीला आहे. तर ठाकरे यांचा प्रवास हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत चढता आणि रोखठोक, हिंदुत्ववादी होता पण नंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरे होत आज पवार आणि ठाकरे यांच्या पिढ्या नाजूक वळणावर उभ्या आहेत. मुंबई महापालिका हा ठाकरे यांचा प्राण मानला जातो आणि या महापालिकेतील सत्ता जाते की राहते अशी अस्तित्वाची, परीक्षेची वेळ समोर असलेने ठाकरे बंधू एकमेकांना टाळ्या देत गाठीभेटी घेत आहेत आणि दसरा मेळाव्यात शिवसेना उबाठा व मनसे म्हणजे राज ठाकरे यांची युती होणार अशी अटकळ बांधली जाते आहे. ब्रॅंड टिकवण्यास, अस्तित्व राखण्यासाठी त्याशिवाय दोन्ही बंधूंना पर्याय उरलेला नाही. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे व राज ठाकरे एकमेकांबद्दल कसे बोलत होते व राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे कसे पराभूत झाले हे महाराष्ट्र विसरलेला नाही. पण आता कोणताच इलाज उरलेला नाही म्हणून हे दोघे ठाकरे बंधू ब्रॅंड वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत. दसरा मेळाव्यात किंवा त्यानंतर निवडणूका जाहीर झाल्यानंतर त्यावेळचे फायदे तोटे, जागा, वगैरे लक्षात घेऊन युतीचा अंतिम निर्णय होईल, पण विलीनीकरण होणार नाही असे दिसते आहे. युती होणार असे गृहीत धरुन शिवसैनिक आणि मनसैनिक काही ठिकाणी हातात हात घेताना दिसत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे एकमेकांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे दोघेही सावध पावले टाकत आहेत. ते स्वाभाविक आहे व योग्यही आहे. दोघे एकमेकांच्या घरी जाणे, भोजन, पार्ट्या करणे, वगैरे वगैरे पावले पडत आहेत कारण दोघांच्या राजकीय अस्तित्वाचीच लढाई समोर ठाकली आहे. गेल्या काही वर्षांत राज ठाकरे यांनी आपल्या राजकीय भूमिका सतत बदलत्या, उलट सुलट घेतल्या पण त्यांना अपेक्षित यश आलेले नाही. ‘एकदा महाराष्ट्र माझ्या हाती सोपवा आणि बघा’ या त्यांच्या आवाहनाला टाळ्या मिळत राहिल्या पण समर्थन कधीही मिळाले नाही तर दुसरीकडे शिवसेना उबाठा दिसामाजी शक्तिहिन होते आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत जी मते फुटली ती महाराष्ट्रातील आणि ठाकरे, शरद पवार तंबुतील असे सांगितले जाते आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरीचा लौकिक आगळा वेगळा आहे. उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा कौल डावलून शरद पवार व राहुल गांधी यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना खुर्ची मिळाली पण पाठीराखे निघून गेले, भाजपाला केंद्रात पूर्ण बहुमत नव्हते. त्यांना मित्रांना सोबत घेऊन सत्ता राखायची होती. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटीला भाजपाचे प्रोत्साहन होते व आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र येणार असे वातावरण आहे पण एकत्र येऊनही ते मुंबई महापालिका जिंकणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रॅंड सत्तेत राखणे ही ठाकरेची गरज आहे, मुंबईची गरज आहे का? हे महापालिका निवडणुकीनंतर कळेल. दसरा मेळाव्यात राज-उद्धव युतीची घोषणा झाली तर राज्यातील महाआघाडी आणि देशातील इंडीगठबंधन संघटीत राहणार का? हा नवा प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिका आणि अल्पसंख्याकांबद्दलचे धोरण कॉंग्रेस व अन्य घटक पक्षांना परवडेल असे वाटत नाही. कॉंग्रेसने उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांसोबत हवा तसा वापर करुन घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, भूमिका सोडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी कॉंग्रेसला मिठी मारली, असा त्यांच्यावर आरोप आहे आणि तो खोटा नाही. ओघानेच दोन भाऊ एकमेकांना टाळ्या देत एकत्र आले. त्यांनी युती केली तरी महाआघाडी त्यांच्यासोबत राहील अशी शक्यता दिसत नाही. प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी हायकमांड ठरवतील अशी प्रतिक्रिया दिली आहे, ती पुरेशी बोलकी आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत पंधरा जणांनी मतदान केले नाही तर पंधरा जणांनी क्रॉस व्होटिंग केले. या 30 जणांच्या वर्तनातून इंडी आघाडीची अवस्था जगजाहीर झाली आहे. देशातील घराणेशाही संपवायची असाही एक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा आहे. वारंवार ते बोलून दाखवतात. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे राजकीय पक्ष दिसत असले तरी ते पक्ष काही घराण्यांमार्फत चालवले जतात. मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरे ब्रॅंडला नामोहरण करण्यासाठी संधी आहे तर ही निवडणूक ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाची कसोटी ठरणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आणि ही निवडणूक निकराने लढवली जाणार, हे स्पष्ट आहे. ठाकरे ब्रॅंड वाचवण्यासाठी सुरु असलेल्या या प्रयत्नात कितपत यश येते, हे बघावे लागेल. राज ठाकरे कशीही भूमिका घेऊ शकतात पण ते मनसेचे अस्तित्व स्वतंत्र ठेवणार आणि जागावाटप ठरल्यावरच युती करणार हे उघड आहे. राज व उद्धव यांचा निर्णय होत नाही तोवर कॉंग्रेस सावध भूमिका घेणार हेही स्पष्ट आहे. राज्यात राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकर हे नवी तिसरी आघाडी करायच्या तयारीत आहेत. हे सर्व लक्षात घेता आगामी काळ हा नव्या समीकरणांचा दिसतो आहे. ठाकरे व पवार यांचे पक्ष टिकणार का? हे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकानंतर स्पष्ट होईल. तूर्त ब्रॅंड वाचवण्यासाठी टाळ्या दिल्या, घेतल्या जात आहेत. देशात अन्य राज्यांच्या निवडणुकीत कसा कौल येतो, हे बघावे लागेल. दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे हे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार हे उघड आहे. तूर्त राजकीय निरीक्षक सर्व हालचालीवर नजर ठेऊन आहेत.
Previous Articleअच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर
Next Article ‘नवी भू-आर्थिक मांडणी’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








