चिपळूण :
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शहरात मोठा धक्का बसणार आहे. अभ्यासू व शहराचे मोठे पद असणारा माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. लवकरच मुख्य पदांवर कार्यरत असणारे अनेकजण शिंदे शिवसेना पक्षात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे पक्ष येथे अडचणीतच येणार आहे. यामुळे नजीकच्या काळात पक्षाची होणारी बिकट अवस्था लक्षात घेता अनेकजण आपले सत्ताधारी पक्षांमध्ये पुनर्वसन करण्यासाठी धडपड करीत आहेत. यातूनच हा अभ्यासू व शहराचे मोठे पद असणारा माजी नगरसेवक भाजपमध्ये जात आहे.
या माजी नगरसेवकाने नगर परिषदेत अनेक महत्चाची पदे भूषवली आहेत. सध्या शहरात मुख्य पदावर काम करताना पक्षाला उभारी देण्याचे काम हा माजी नगरसेवक करीत आहे. त्याने कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी केली असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांना येथे जास्त मते मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. असे असताना हाच माजी नगरसेवक आता भाजपमध्ये जात असल्याने ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. हा पक्षप्रवेश 28 रोजी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून यावेळी होणार असल्याचे समजते.
- पक्षात येणाऱ्यांचे स्वागत
जे पक्षात येऊन काम करण्यास तयार आहेत, पक्षवाढीसाठी ज्यांचा फायदा होणार आहे, अशा सर्वांचे पक्षात स्वागतच आहे, असे भाजप जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू यांनी सांगितले.








