सभागृहात चड्डी बनियन गँगवरुन दोघेही भिडले
मुंबई /प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाचा आठवड्याचा पहिलाच दिवस वादळी ठरल्याचे दिसून आले. यामध्ये आदित्य ठाकरे आणि नीलेश राणेंचा वाद सर्वाधिक लक्षवेधी ठरला आहे. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे, युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे चांगलेच आक्रमक झाले. तुमच्याच जर हिंमत असेल तर नाव घ्या, नाहीतर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत असेही यावेळी नीलेश राणे यांनी म्हटले.
म्हणून मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेचे असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डीबनियन गँग, ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. च•ाr बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
हिंमत असेल तर नाव घ्या : नीलेश राणे
आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर शिंदे गटाचे नीलेश राणे चांगलेच भडकले. ते म्हणाले की, ठत्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कुणावर कारवाई व्हावी हे सांगावं. नेमकं चड्डी कोण आणि बनियन कोण हे त्यांनी सांगावे. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावे. उगाच टीका करायची म्हणून काहीही बोलले जाते. हे जे शब्द वापरले आहेत ते कुणासाठी आहेत, त्यांचे नाव घ्यावे. नाहीतर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. बघूया त्यांच्यात किती हिंमत आहे ती असे थेट आव्हानच नीलेश राणे यांनी दिले.
बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजी कायद्यासाठी समिती स्थापणार : मंत्री माधुरी मिसाळ
राज्यात बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅबच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत विधान परिषदेत सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहते. या प्रकरणी सखोल तपास व कठोर कायदा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. या पार्श्वभूमीवर बोगस डॉक्टर आणि पॅथॉलॉजीविरोधात उपाययोजना व सूचना ऐकण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने या विषयावर गंभीर दृष्टिकोन घेतला असून, नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कायद्याच्या माध्यमातून ठोस निर्णय घेतले जाणार असल्याची ग्वाही मंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.
आगामी अधिवेशनात धर्मांतरण विरोधी कायदा आणणार : राज्यमंत्री पंकज भोयर
राज्यात लवकरच धर्मांतरण विरोधी कायदा लागू होणार असून महाराष्ट्र हे देशातील अकरावे राज्य ठरणार आहे. अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. या कायद्याबाबत तयारी सुरू असून पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवालही प्राप्त झाला असून आगामी अधिवेशनात हा कायदा सादर केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.








