सावंतवाडी / प्रतिनिधी
Thackeray group’s April Fool’s protest tomorrow against Minister Kesarkar!
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणा, आश्वासनाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत म्हणून उद्या शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता एसटी बस स्थानकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने एप्रिल फूल ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात येणार आहे असे ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी जाहीर केले आहे.
राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,गेली तेरा वर्ष सावंतवाडी मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार यांनी अनेक आश्वासनं जनतेला दिली. परंतु दिलेली आश्वासनांची पूर्तता केलीच नाही. आमदार मंत्री झाले, तरी अनेक प्रश्न सुटले नाहीत. उलट सावंतवाडी तालुक्यात विकास कामे अर्धवट आहेत अथवा सुरू झालेली नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे सावंतवाडी एसटी बस स्थानक हे आहे.
सावंतवाडी तालुक्यातील घोषणा, आश्वासन याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी एसटी बसस्थानक एप्रिल फुल ढोल बजाओ आंदोलन छेडण्यात येणार आहे. गेली सहा वर्षांपूर्वी सदर डेपोचे व बसस्थानकाचे काम सुरू होऊन सुद्धा आज पर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत व ठेकेदाराचे लाड होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जनतेसाठी प्रशासनाच्या विरोधात एप्रिल फुल ढोल बजाओ बसस्थानकावर छेडण्यात येणार आहे. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रूपेश राऊळ यांनी केले आहे.









