ऑनलाईन टीम / मुंबई :
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठविलेल्या नोटीसला ठाकरे गट उत्तर देणार नाही. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आम्ही याचिका दाखल केली होती. विधानसभा अध्यक्षांकडे या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या 16 आमदारांनीच नोटीसला उत्तर देणे अपेक्षित आहे. कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर न देण्याची भूमिका घेतल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांनी यावर निर्णय द्यायचा आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. ही मुदत संपली तरीदेखील ठाकरे गटाने उत्तर दिलेले नाही.
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात आम्ही कारवाईची मागणी केली होती. यामध्ये 16 आमदारांनीच नोटीसला उत्तर देणे गरजेचे आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर देणार नसल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.