रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी उबाठा सेनेचे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुधीर मोरे गुरुवारी रात्री आपल्या अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यांनी यावेळी आपल्यासोबत कोणालाही घेतले नव्हते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दुपारी दोन वाजता सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.









