रायगडमध्ये भरत गोगावले महाड, तर योगेश कदम हे खेड मतदार संघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले, कदम यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये स्नेहल जगताप आणि खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांना पक्षात प्रवेश दिला आहे. कोकणातील दोन्ही जागांवर शिवसेनेला तूर्तास पर्याय मिळाला असला तरी अन्यठिकाणी पर्याय कसे उभे करतात हे महत्वपूर्ण ठरणारे आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये राज्य पातळीवर मोठी फूट पडून सत्तांतर झाले. यामध्ये शिवसेनेच्यादृष्टीने अभेद्य असलेल्या कोकणातही मोठा हादरा बसला. रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या तीन जिल्हयांचा विचार केला तर पंधरा विधानसभा मतदरासंघ येतात. यामध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ आमदार निवडून गेले होते. आता त्यातील सहा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यातील दिपक केसरकर आणि उदय सामंत हे दोघेही मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री तर भरत गोगावले हे विधानसभेत पक्षाचे प्रतोद आहेत. पक्षाचे एकापाठोपाठ एक असे मातब्बर आमदार निघून गेल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कोकणातील आपले अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनाही कोकणात आपले अस्तित्व नव्याने प्रस्थापित करायचे असल्याने त्यांनीही आपले प्रयत्न सुरू केले आहेत. रायगड मतदार संघातील महाडचे आमदार भरत गोगावले, आ†लबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खेड-दापोली मतदार संघाचे योगेश कदम, त्यानंतर सिंधुदुर्गातून दीपक केसरकर, रत्नागिरीतून उदय सामंत यांनी शिंदे यांना साथसंगत केल्याने शिवसेनेच्या वर्षानुवर्षे अभेद्य असलेल्या या गडाला कोकणात मोठे भगदाड पडले आहे.
शिवसेना ठाकरे गटाची सध्या राज्यात अस्तित्वाची लढाई चालू आहे. त्यामध्ये मुंबईप्रमाणेच कोकणातले रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड हे तीनही जिल्हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने ठाकरे यांचे कोकणातील दौरेही वाढले आहेत. त्यातूनच कोसळलेल्या गडाची डागडूजी करण्याच्यादृष्टीने त्यांनी स्वता लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. खेडच्या गोळीबार मैदानावर गेल्याच महिन्यात त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ा†ना†मत्त होतं राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या ा†शवसेना प्रवेशाचं. संजय कदम यांनी शिवसेनेत असताना जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद आणि त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून विधानसभेवर निवडूनही गेले. रामदास कदम, योगेश कदम यांनी बंडखोरी केल्याने येथे शिवसेना काहीशी खिळखिळीत झाली. त्यामुळे या मतदारसंघात कदम पिता-पुत्राना पर्याय म्हणून येथे पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या संजय कदमांना पक्षात घेण्यात आलं. ज्याप्रमाणे महाडच्या स्नेहल जगताप यांना शिवसेनेत घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष कॉंग्रेसने ज्यापध्दतीने आपली नाराजी प्रकट केली त्या तुलनेत संजय कदमांवेळी राष्ट्रवादीने चकार शब्दही काढला नाही.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाडमध्ये उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला, परंतु ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने महाविकास आघाडीतला ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र उद्धव ठाकरेंवर नाराज आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबत म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की, हे करू नका. पण तरीही त्यांनी केलं. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशाप्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
खरंतर स्नेहल जगताप या गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेनेत (ठाकरे गट) जाण्यास इच्छुक होत्या. सहा महिन्यांपूर्वी जगताप यांनी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांना विनंती केली की, जगताप यांना पक्षात प्रवेश देऊ नये. त्यामुळे बरेच महिने हा प्रवेश रखडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा पक्षप्रवेश पूर्ण झाला.
शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले भरत गोगावले महाड मतदारसंघाचे आमदार आहेत. ते शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या शिंदे गटात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गोगावले यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करता यावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मुळात काँग्रेसचे माणिकराव जगताप (स्नेहल जगताप यांचे वडील) या मतदार संघातून निवडणूक लढत होते. आता स्नेहल जगताप या इथल्या उमेदवार असतील. उद्धव ठाकरे सध्या 40 बंडखोर आमदारांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या आमदारांना पर्याय शोधत आहेत. यापूर्वी त्यांनी खेड येथे घेतलेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्याच धर्तीवर आता जगताप यांना प्रवेश दिला आहे.
कोकणातील बंडखोर सहा आमदारांपैकी खेडचे योगेश कदम आणि महाडचे भारत गोगावले या दोन आमदारांच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला पर्यायी उमेदवार मिळाले असले तरी आ†लबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, सिंधुदुर्गातून दीपक केसरकर, रत्नागिरीतून उदय सामंत चार आमदारांच्या समोरचे पर्याय शिल्लक आहेत. यामध्ये रत्नागिरीत मंत्री सामंत यांच्यासमोर पर्याय म्हणून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्याही शिवसेना प्रवेशाच्या चर्चा अधूनमधून सुरू आहेत. अन्यठिकाणी पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये तोडीस तोड उमेदवार मिळाले तर ठीक; नाहीतर महाविकास आघाडी झाली तर ताकद पाहून मित्रपक्षाला जागा सोडून त्या बदल्यात अन्य कोणती जागा पदरात पडते का तेही पाहिले जाणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेत कोकणी नेत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. मुंबईपासून ते थेट सिंधुदुर्गपर्यत राजकीय आघाड्यांवर कोकणी चेहरेच प्रामुख्याने दिसून येतात. त्यामुळे शिवसेना आणि कोकण यांचे नाते अतुट आहे. असे असतानाच शिवसेनेमधील फुटीचे पडसाद कोकणात मोठ्याप्रमाणात उमटलेले असल्यानेच त्याची दखल घेणे ठाकरे यांना क्रमप्राप्त आहे. राज्यात सत्तेवर यायचे असेल तर आपल्या हक्काचे कोकण हातात हवे. त्यामुळेच त्यादृष्टीने ठाकरे हे पावले टाकताना दिसत आहेत.
राजेंद्र शिंदे








