रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेत राजकीय उलथापालथीना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे शिवसेनेतील अनेक वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. नुकताच राजापूर विधानसभा माजी आमदार राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर देखील रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे सेनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा वेग थांबलेला नाही. ठाकरे सेनेला जोरदार धक्के बसू लागलेत. आता पुन्हा एकदा जोरदार झटका मिळाला आहे. ठाकरे सेनेकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

तर राजेंद्र विष्णु महाडिक यांनी वैयक्तिक कारणास्तव मी पक्षाच्या सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. तसेच शिवसेना उ.बा.ठा. पक्षासंबंधित सर्व जबाबदारी मधून मुक्त होत असल्याचे दिलेल्या राजीनामा पत्रामध्ये महाडिक यांनी म्हटले आहे.








