ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाण्याच्या मनोरमानगरमध्ये असलेली शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गट आज आमनेसामने आले. दोन्ही गटात राडा झाल्याने शाखेबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यानंतर शाखेबाहेर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनोरमानगरमध्ये असलेल्या कुंभारवाडा शाखेत आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसले होते. त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन शाखेवर हक्क दाखविण्यास सुरूवात केली. याला ठाकरे गटाने विरोध केला. त्यावेळी या शाखेची डागडुजी आणि देखभाल वर्षानुवर्षे आम्हीच करत आहोत, बाहेरच्या लोकांना आम्ही शाखा ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली. त्यावेळी शिवसैनिकही आक्रमक झाला. दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद चिघळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटाची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.
अधिक वाचा : समृद्धी महामार्गावर 120 किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित
पोलिसांच्या उपस्थितीत या शाखेला टाळे लावण्यात आले. त्याची एक चावी शिंदे गटाकडे तर दुसरी ठाकरे गटाकडे देण्यात आली. सामंजस्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते वेगवेगळय़ा वेळेत याठिकाणी बसतील, असा तूर्तास तोडगा काढण्यात आला.