7 हजार 888 परीक्षार्थी : शिक्षण खात्याकडून तयारी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार दि. 6 रोजी होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 7 हजार 888 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडण्यासाठी शिक्षण खात्याने जय्यत तयारी सुरू केली आहे. परीक्षार्थींना कोणतीही अचडण येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
राज्यात शिक्षक भरती प्रकियेसाठी टीईटी घेण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रकियेमध्ये निश्चित करण्यात आलेल्या जागांपेक्षा गुणवत्ताधारकांची संख्या कमी होती. त्यामुळे पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून टीईटी घेण्यात येत आहे. दि. 6 रोजी टीईटीचे दोन्ही पेपर घेतले जाणार आहेत.
परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कर्नाटकात पीएसआय व प्राध्यापक भरती प्रकियेमध्ये गैरव्यवहार झाला होता. महाराष्ट्रात टीईटी उत्तीर्ण परीक्षार्थी बोगस निघाले होते. त्यामुळे टीईटी काटेकोरपणे घेण्याकडे शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. परीक्षार्थींनी हॉलतिकीट डाऊनलोड करून घेतले असून परीक्षेची तयारी सुरू आहे.
शहरात 29 केंद्रांवर परीक्षा
बेळगाव शहरातील 29 केंद्रांवर टीईटी घेतली जाणार आहे. सरदार्स हायस्कूल, शर्मन इंग्रजी व कन्नड हायस्कूल, सेंट झेवियर्स स्कुल, मराठी विद्यानिकेतन, वनिता विद्यालय, बेननस्मिथ हायस्कूल, महिला विद्यालय हायस्कूल, जी. ए. पदवीपूर्व कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर शाळा, ठळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श विद्यालय, केएलएस स्कूल, भरतेश हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, सेंट ऍन्थोनी हायस्कूल, डी. पी. स्कूल, चिंतामणराव हायस्कूल, गोमटेश हायस्कूल, सिद्धरामेश्वर हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, कन्नड माध्यमिक शाळा महांतेशनगर, महांतेश हायस्कूल, लिटल स्कूल कणबर्गी रोड येथे परीक्षा होणार आहे.









