मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती :‘भारत 6 जी अलायन्स’ सुरु : चिप कारखान्याची 4 ते 6 आठवड्यात पायाभरणी
नवी दिल्ली :
भारतातील दूरसंचार तंत्रज्ञान आणि 6जी सेवा विकसित करण्यासाठी ‘भारत 6जी अलायन्स’ लाँच करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात याचे सादरीकरण केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की गुजरातमध्ये भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप प्रकल्पाची पायाभरणी 4 ते 6 आठवड्यांत केली जाईल. वैष्णव म्हणाले, ‘आम्ही डाटा संरक्षण विधेयकासाठी तयार आहोत. आशा आहे, आम्ही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ते मांडू.’
6जी अलायन्स आणि सेमीकंडक्टर चिपची योजना
हे काम 2030 पर्यंत दोन टप्प्यात पूर्ण होईल दूरसंचार मंत्री म्हणाले की बुधवारी ‘भारत 6जी अलायन्स’ (बी6जीए) नावाची संघटना स्थापन करण्यात आली आहे. लवकरच देशात 6जी नेटवर्कची चाचणी सुरू होईल. ही संस्था देशांतर्गत उद्योग, शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय संशोधन संस्था आणि सरकार-अनुदानित संस्था यांची एक युती आहे. ती सरकारसह विविध क्षेत्रातील संस्थांना मदत करणार आहे. भारत 6जी अलायन्स अंतर्गत नवकल्पनांसाठी संशोधन आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. तसेच हे अभियान दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा 2023-2025 (दोन वर्षे) आणि टप्पा-2 2025 ते 2030 या कालावधीत पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सेमीकंडक्टर चिप डिसेंबर 2024 पर्यंत बनणार
वैष्णव म्हणाले, ‘गुजरातमध्ये सेमीकंडक्टर चिप कारखान्यासाठी जमीन यापूर्वी देण्यात आलेली आहे. कारखान्याचा भूमिपूजन समारंभ येत्या 4 ते 6 आठवड्यांत होणे अपेक्षित आहे. या कारखान्यात सेमीकंडक्टर चिपचे उत्पादन डिसेंबर 2024 पर्यंत सुरू होईल.
चिप डिझाइनसाठी 5 कंपन्यांना मान्यता मिळाली
सरकारच्या डिझाईन-लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत 5 कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. या कंपन्यांनी चिप डिझाईनसाठी चांगले प्रस्ताव दिले आहेत, ज्यामध्ये उपग्रह कम्युनिकेशनसाठी एक आणि बीम निर्मितीसाठी प्रस्ताव दिला आहे. अत्यंत क्लिष्ट चिप्स डिझाइन करण्याचे प्रस्तावही मिळाले आहेत.
मायक्रॉन भारतात 6,758 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
मायक्रॉन भारतात 6,758 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 28 जून रोजी अमेरिकन चिप निर्माता कंपनी मायक्रॉनने सेमीकंडक्टर चिप प्लांटसाठी भारत सरकारसोबत करार केला होता. या सुविधेत सुमारे 6,758 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मायक्रॉनचे म्हणणे आहे.
देश 2030 पर्यंत 6 जीत आघाडी घेणार
ते म्हणाले की, भारताला 6जी तंत्रज्ञानामध्ये 200 हून अधिक पेटंट मिळाले आहेत. या युतीमुळे भारताला 2030 पर्यंत 6जी तंत्रज्ञान आणि उत्पादनात अग्रगण्य योगदानकर्ता बनण्यास सक्षम करेल. भारत आज जगातील 3 सर्वात मोठ्या 5जी इकोसिस्टममध्ये सामील झाला असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी सांगितले आहे.









