कॉपर डॅम हटविण्यास सुरू : धरण क्षेत्रातील 90 टक्के काम पूर्ण
विनोद सावंत कोल्हापूर
काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे. 54 किलोमीटरपैकी 15 किलोमीटरच्या पाईपलाईनचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. इंटेकवेल ते जॅकवेलची पाईपलाईनचेही काम पूर्ण झाले आहे. धरणातील पाणी जॅकवेलच्या ठिकाणी येऊ नये म्हणून उभारण्यात आलेला कॉपर डॅम हटविण्यास सुरूवात झाली असून हे काम दोन दिवसांत होवून धरणातून पाणी जॅकवेलमध्ये येण्याचा प्रकल्पातील महत्वाचा ठप्पा पूर्ण होणार आहे.
कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेचे काम गतीने सुरू झाले आहे. पाऊस लांबल्यामुळे जुन महिन्यांतही काम करता येत आहे. दोन्ही जॅकवेलपेकी एक जॅकवेलचे कामे पूर्ण झाली असून पंप हाऊसचे काम सुरू आहे. दुसऱ्या जॅकवेलचा स्लॅबचे काम अंतिम टप्प्यावर आहे. याचबरोबर सर्वात महत्वाचे असणारे इनटेक वेल ते जॅकवेलपर्यंतची पाईपलाईन टाकूनही झाली आहे. धरण क्षेत्र ते पुईखडी मार्गावरील पाईपलाईनचे दोन ठिकाणी काम थांबले होते. त्यापैकी हळदीतील काम सुरू झाले आहे. अर्जुनवाडा येथे दीड मीटर पाईपलाईन टाकणे बाकी आहे. लवकरच येथीलही काम सुरू होईल. धरण क्षेत्रासह पाईपलाईनची सर्व कामे महिन्यांत पूर्ण करण्याचा टार्गेट आहे.
यंदा काळम्मावाडीच्या पाण्यानेच अभ्यंगस्नान
शिल्लक राहिलेली 40 मीटरची पाईपलाईन, दोन्ही जॅकवेलचे पंप हाऊस, बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईन अशी कामे पुढील महिन्यांत पूर्ण होतील, असा दावा मनपाने केला आहे. कामाची गती आणि शिल्लक कामे पाहता पुढील दोन ते तीन महिन्यांत योजनेची कामे पूर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीच्या पाण्यानेच अभ्यंगस्नान होण्याची शक्यता आहे.
60 लाख लिटर पाण्याचा उपसा वाढणार
काळम्मावाडी धरणातून रोज 240 एमएलडी पाणी उपसा होईल, अशी तरतूद करून ठेवली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 180 एमएलडीच पाणी उपसा होईल. भविष्यात पाण्याची गरज पाहून 60 एमएलडी (60 लाख लिटर) पाणी उपसा वाढविला जाणार आहे. यामुळे पाण्याची कमतरता जाणवणार नाही.
पावसातही काम सुरू राहणार
पावसाचे पाणी आल्याने धरणक्षेत्रातील कामे थांबत होती. सहा महिने येथे काम करता येत नव्हते. आता इनटेक वेल, इन्स्फेक्शन वेलची कामे झाली असल्याने दोन्ही जॅकवेलवरील पंप हाऊस, शिल्लक पाईपलाईनची कामे, विद्युतलाईनसह इतर कामे पावसामध्येही करणे शक्य आहेत.
पूर्ण झालेली कामे
इनटेक वेल, इन्स्फेक्शन वेल एक, इन्स्फेक्शन वेल दोन, इनटेक वेल ते जॅकवेल पाईपलाईन, 15 लाख क्षमतेचे ब्रेक प्रेशर टँक, पुईखडी येथे 80 एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र, 70 ठिकाणचे व्हॉल्व बसवणे.
शिल्लक कामे
पाईपलाईन -53 किलोमीटरपैकी 40 मीटर शिल्लक
बिद्रीते जॅकवेल विद्युतलाईन – 27 किलोमीटरपैकी 1 किलोमीटर
जॅकवेल 1 – जॅकवेल पूर्ण होवून पंपिंग हाऊसचे काम सुरू
जॅकवेल 2 – जॅकवेलच्या स्लॅबचे काम अंतिम टप्प्यात
कॉपर डॅम हटवण्याचे काम दोन दिवसांत पूर्ण होवून धरणातून जॅकवेलमध्ये पाणी आणले जाणार आहे. 15 किलोमीटर पाईपलाईनचे क्लिनींग आणि प्रेशर टेस्टींग पूर्ण झाले आहे. हळदी येथील शिल्लक पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे. अर्जुनवाडा येथील काम दोन दिवसांत सुरू होईल. बिंदू चौक ते जॅकवेल अशी भूमिगत विद्युतलाईनचे 1 किलोमीटरचे काम बाकी आहे.
नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता, महापालिका
थेटपाईपलाईनला मंजूर निधी -488 कोटी
वर्कऑर्डर- 22 ऑगस्ट 2014
कामची मुदत-30 महिने
पाचव्यांदा दिलेली मुदत -31 मे 2023









