बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला पोलिसांनी मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले होते. या खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू असून या गुन्ह्यातील 166/15 खटल्यामध्ये मंगळवारी फिर्यादीने साक्ष दिली आहे. त्यामुळे या खटल्याच्या कामकाजाची आता नियमित सुनावणी सुरू झाली आहे. पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी असून 30 जणांना या खटल्यामध्ये गोवण्यात आले आहे. येळ्ळूरच्या जनतेला नाहक त्रास देण्यासाठी हे खटले दाखल करण्यात आले असून या खटल्यांमध्ये असलेले साक्षीदार आणि फिर्यादी अनेक तारखांना उपस्थित राहिले नाहीत. संमन्सही बजावण्यात आले. तरीदेखील उपस्थित राहिले नाहीत. त्याचा फटका येळ्ळूरच्या निष्पाप जनतेला बसला आहे. गेल्या आठ वर्षांपासून या खटल्यांचे कामकाज सुरू आहे. मात्र अद्याप निकाल लागला नाही. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत. मंगळवारी आणखी दोन खटले होते. मात्र ते खटलेदेखील पुढे ढकलण्यात आले आहेत.
आज एका खटल्याचा निकाल लागणार…
येळ्ळूरच्या जनतेवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील 167/15 या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. बुधवारी या खटल्याचा निकाल लागणार आहे. यासाठी या खटल्यामध्ये असलेल्या 26 जणांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वकिलांनी केले आहे.









