सौरभ कुमारचे सामन्यात 9 बळी, कार्टरचे शतक वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
यजमान भारत अ संघाने रविवारी येथे न्यूझीलंड अ संघाविरुद्धची तीन सामन्याची अनधिकृत कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारत अ ने न्यूझीलंड अ संघाचा 113 धावांनी दणदणीत पराभव केला. भारत अ संघातील गोलंदाज सौरभ कुमारने या सामन्यात एकूण 9 गडी बाद केले. न्यूझीलंड अ संघाच्या दुसऱया डावात जो कार्टरचे शतक (111) वाया गेले.
या कसोटी सामन्यात भारत अ संघाने पहिल्या डावात 293 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंड अ संघाने पहिल्या डावात 237 धावा केल्या. भारत अ ने पहिल्या डावात 56 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारत अ संघाने दुसऱया डावात दमदार फलंदाजी करत 85 षटकात 7 बाद 359 धावावर डावाची घोषणा केली. रजत पाटीदारचे नाबाद शतक तसेच कर्णधार पांचाळ, गायकवाड आणि सर्फराज खान यांची अर्धशतके वैशिष्टय़े ठरली. न्यूझीलंड अ संघाला निर्णायक विजयासाठी 416 धावांचे कठीण आव्हान मिळाले.
न्यूझीलंड अ ने 1 बाद 20 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली पण सौरभ कुमारच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा दुसरा डाव 85.2 षटकात 302 धावात आटोपला. सलामीचा फलंदाज कार्टरने 230 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह 111, क्लेव्हरने 9 चौकारासह 44 तर चॅपमनने 1 षटकार आणि 5 चौकारासह 45 धावा जमविल्या. कार्टरचे शतक न्यूझीलंड अ संघाला पराभवापासून टाळू शकले नाही. भारत अ संघातर्फे सौरभ कुमारने 103 धावात 5 तर सर्फराज खानने 2 तसेच शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सौरभ कुमारने न्यूझीलंड अ संघाच्या पहिल्या डावात 48 धावात 4 गडी बाद केले होते. या मालिकेतील पहिले दोन सामने दोन्ही संघांनी अनिर्णित राखले होते.
संक्षिप्त धावफलक ः भारत प. डाव 293, न्यूझीलंड अ प. डाव 237, भारत अ दु. डाव 7 बाद 359 डाव घोषित, न्यूझीलंड अ दु. डाव 85.2 षटकात सर्वबाद 302 (कार्टर 111, क्लेव्हर 44, चॅपमन 45, ब्रुस 19, ओडोनील 19, सौरभ कुमार 5-103, सर्फराज खान 2-48, ठाकुर, उमरान मलिक, मुकेश कुमार प्रत्येकी एक बळी.)









