वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये आता नव्याने क्रिकेटपटूंसंदर्भात नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. आता या तांत्रिक बदली नियमांची चाचणी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत केली जाणार असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले.
बीसीसीआयच्या या नव्या नियमांचा सहभागी झालेल्या संघांना प्रत्येक सामन्यासाठी एका बदली खेळाडूचा वापर करण्याची तरतूद केली आहे. हा नवा नियम आयपीएल स्पर्धेतही अंमलात आणला जाणार आहे. तत्पुर्वी या नव्या नियमाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जाईल किंवा नाही याची चाचणी पुरुषांच्या राष्ट्रीय टी-20 मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत होणार आहे.
बीसीसीआयने या नव्या इम्पॅक्ट प्लेयर रुल संदर्भात खुलासा केला आहे. दरम्यान प्रत्येक सामन्यामध्ये संघांना एक बदली खेळाडू घेण्याची तरतुद केली असून या नियमा संदर्भात सविस्तर खुलास बीसीसीआयने विविध राज्यांच्या क्रिकेट संघटनांना इमेलद्वारे कळविला आहे. गेल्या काही दिवसापासून बीसीसीआय हा नव नियम आयपीएल स्पर्धेत अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. आता 2023 च्या आयपीएल स्पर्धेत या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अलीकडच्या कालावधीत क्रिकेटचा अति जलद टी-20 या क्रीडा प्रकाराला अधिक प्रतिसाद मिळत आहे. सामन्यात नाणेफेक करण्यापूर्वी दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू तसेच चार बदली खेळाडूंची यादी जाहीर करतात. आता चार बदली खेळाडूंपैकी एका खेळाडूचा वापर त्या सामन्यात करण्याची परवानगी या नव्या नियमानुसार देण्यात आली आहे.









