नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने विकसीत केलेल्या आणि चांद्रयान (3) अभियानासाठी आवश्यक असणाऱया अग्निबाण इंजिनाचे महत्वपूर्ण परीक्षण यशस्वी झाले आहे. यामुळे भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्वाची उपलब्धी मिळविली आहे. हे इंजिन सीई-क्रायोजेनिक इंजिन या नावाने ओळखले जाते. त्याची फ्लाईट ऍक्सेप्टन्स हॉट टेस्ट मंगळवारी करण्यात आली.
ही चाचणी तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या परीक्षण केंद्रावर मंगळवारी करण्यात आली. ती पूर्वनिर्धारित कालावधीसाठी, अर्थात, 25 सेकंदांसाठी होती. क्रायोजेनिक इंजिन हा कोणत्याही अग्निबाणाच्या प्रक्षेपणासाठी आवश्यक असणारा महत्वाचा भाग असतो. भारताला आता हे इंजिन देशातच विकसीत करण्यात यश आले आहे. या चाचणीकडून असणाऱया जवळपास सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत.
आता हे इंजिन प्रोपेलंट टाक्या, स्टेज स्ट्रक्चर्स आणि असोशिएटेड फ्यूईड लाईन्स यांच्याशी संमिलित केले जाणार आहे. त्यानंतर एका परिपूर्ण फ्लाईट क्रायोजेनिक स्थितीचा विकास होणार आहे. या संबंधातील कामही प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल, असे प्रतिपादन इस्रोने केले.
लँडरचाही विकास
चांद्रयान 3 चा लँडरही मागच्या वर्षात विकसीत करण्यात भारताला यश आले होते. या लँडरची ईएमआय, ईएमसी चाचणी यु. आर. राव उपग्रह केंद्रावर यशस्वीरित्या करण्यात आली होती. उपग्रहातील इतर उपव्यवस्थांच्या विकासाठी ही परीक्षणे आवश्यक होती. अवकाशात उपग्रह अधिक काळ टिकून रहावा यासाठी हे प्रयत्न केले जात असून विविध चाचण्या केल्या जात आहेत.
चांद्रयान-2 अभियानाच्या पाठोपाठ…
चांद्रयान-2 च्या पाठोपाठ आता चांद्रयान-3 ची सज्जता प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या यानाची प्रक्षेपण क्षमता, सर्व आरएफ सिस्टिम्सचे अँटेना पोलोरायझेशन स्टँड अलोन ऑटो क्षमतेचे परीक्षण, ऑरबिटल आणि पॉवर्ड डीसेंट क्षमतेचे परीक्षण, तसेच लँडर आणि रोव्हर क्षमतेचे परीक्षण करण्यात आलेले असून त्याचे परिणाम समाधानकारक आहेत. एकंदर, चंद्रावर हे यान व्यवस्थितरित्या उतरावे आणि त्याने सुरळीतरित्या चंद्रावर त्याला हालचाल करता यावी, यासाठी इस्रोचे संशोधक प्रयत्न करीत असून आतपर्यंतची परीक्षणे उत्साह वाढविणारी आहेत्. आगामी काळात आणखी परीक्षणे होणार आहे, अशी माहिती आहे.









