ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर तिचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून, देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
गाझियाबादमधील 5 वर्षीय मुलीच्या त्वचेला खाज सुटली होती. तसेच तिच्या शरीरावर पुरळ आणि व्रणही उठले होते. मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे असल्याने या मुलीचे काही नमुने तात्काळ पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठविण्यात आले होते. तसेच तिला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या मुलीच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोनानंतर आता जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नसला तरीही इतर देशांमधील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने यापूर्वीच सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या सूचनेनंतर राज्याच्या आरोग्य विभाग मंकीपॉक्सबाबत सतर्क झाला आहे.
दरम्यान, केंद्राच्या सुचनेनुसार महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. -मागील 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. -या संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
-अशा रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
-रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कॉन्टॅक्ट टेसिंग सुरू केले जाईल.
-रक्ताची थुंकी आणि संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
-गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब ओळखावे लागेल आणि त्यांना क्वारंटाईन करावे लागेल.
-जोपर्यंत संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱया होत नाहीत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन संपवता येणार नाही, असे यात सांगण्यात आले आहे.









