विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटला अखेर ‘गूड बाय’ म्हटलंय…सचिन तेंडुलकर वा महेंद्रसिंह धोनी यांच्या निवृत्तीनंतर जसं असंख्य चाहत्यांना आता क्रिकेट बघायचं तरी कुणासाठी असं वाटलं होतं तशीच भावना अनेक क्रिकेटप्रेमींची आताही झाली असेल यात शंकाच नाही…‘टी-20’च्या ‘सुपरफास्ट’ जमान्यात ‘रटाळ’ वाटणाऱ्या ‘टेस्ट’ क्रिकेटकडे लोकांना ओढून आणण्याची ताकद विराटच्या जबरदस्त फलंदाजीत होती. त्यामुळं कसोटी क्रिकेट पोरकं झालंय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये…
महान विराट कोहली निवृत्त झालाय…आधुनिक जमान्यातील कसोटी सामन्यांच्या भारतीय राजदूतानं अखेर बॅट खाली ठेवलीय…त्या अद्वितीय खेळाडूच्या निर्णयामुळं पोकळी निर्माण होणार हे 100 टक्के निश्चित आणि ती सचिन तेंडुलकरनं रामराम ठोकल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीपेक्षाही जास्त मोठी…त्यामुळं येऊ घातलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराटचे खणखणीत ‘कव्हर ड्राईव्ह’, ‘पूल’ अन् मिड विकेट व लाँग ऑनमधून हाणलेले दर्जेदार फटके यांचं दर्शन घडणार नाहीये. सचिनच्या फलंदाजीला नेहमी विश्लेषक सुंदर काव्याची उपमा द्यायचे, तर कोहलीच्या खेळाचं ‘दर्जेदार निबंध’ असं वर्णन करावं लागेल…
सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्या म्हणजे विराटमध्ये ठासून भरलेले अनेक गुण…कुशल कर्णधार, कुठल्याही परिस्थितीला तोंड देणारा तल्लख मेंदू, लगेच आवाज उठविणारी व्यक्ती, भारताच्या मधल्या फळीचा कणा अन् अन्य कुठल्याही खेळाडूपेक्षा प्रतिस्पर्ध्याचे जास्त चांगल्या पद्धतीनं तीन तेरा वाजविण्याची क्षमता…सचिन तेंडुलकर व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालावधीतील सर्वोत्तम सलामीचे फलंदाज सुनील गावस्कर यांच्याप्रमाणं त्याला दैवी देणगी लाभलेली नव्हती, पण त्या जिगरबाज खेळाडूनं सर्व दोषांवर मात केली ती शिस्तीच्या, तंदुरुस्तीच्या नि परिश्रमांच्या जोरावर. कारकिर्दीच्या सुरुवातीला वागण्याच्या पद्धतीमुळं नेहमी टीकेला तोंड देणारा विराट त्यानंतर मात्र झपकन बदलला…
खेरीज भारतीय संस्कृतीचा ‘तंदुरुस्ती’ या शब्दाशी फारसा संबंध नसल्याचं माहीत असल्यानं त्यानं अखेरपर्यंत त्यावर प्रचंड लक्ष केंद्रीत केलं. युवा खेळाडूंच्या भारतीय संघाला आकार दिला तो सौरव गांगुलीनं, तर ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटला महेंद्रसिंह धोनीनं. विराट कोहलीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास विदेशी भूमीवर जिंकण्याची कला त्यानं आम्हाला शिकविली. त्याच्या व्यक्तिमत्वाची दोन रुपं पाहायला मिळायची ती मैदानावर व मैदानाच्या बाहेर. भारताच्या या सर्वांत यशस्वी कर्णधारानं साऱ्या संघाची रचनाच 360 अंशांत बदलली आणि पाच-पाच जलदगती गोलंदाजांचं दर्शन घडायला प्रारंभ झाला. कदाचित त्याचा त्यांच्यावर जास्त विश्वास असावा…
2014 ते कोव्हिड महामारीपर्यंतचा कालावधी…यादरम्यान विराट कोहलीनं अक्षरश: जग पादाक्रांत केलं. त्याच्या बॅटमधून धावा सातत्यानं बरसायच्या त्या धबधब्याप्रमाणं. तो एखाद्या सर्जनच्या कुशलतेनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा खात्मा करायचा. त्याची फलंदाजी आधारलेली होती ती ‘बॉटम हँड’वर अन् त्याला साथ मिळायची ‘टायमिंग’ची. कोहलीनं क्रिकेट विश्वाला दाखविलं की, दर्जेदार फलंदाजीच्या साहाय्यानं मोठ्या फटक्यांचा सातत्यानं आधार न घेताही क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपात यशस्वी होणं शक्य आहे. एका कॅलेंडर वर्षात तब्बल पाच शतकांची नोंद दोन वेळा करणारा तो एकमेव भारतीय कर्णधार…
2017 व 2018 मध्ये विराट कोहलीनं विक्रम मोडले ते डॉन ब्रॅडमन व राहुल द्रविडचे. त्यांनी सलग तीन विविध कसोटी मालिकांत द्विशतकांची नोंद केली होती. विराटनं असा पराक्रम केला तो सलग चार वेळा…त्याला डोक्यावर लोंबकळणाऱ्या कर्णधारपदाच्या तलवारीनं कधीही छळलं नाही अन् त्यामुळं 54.80 धावांची सरासरी नोंदविणं शक्य झालं. याउलट अन्य कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळताना ती 37.40 पर्यंत घसरली. कोहलीच्या निवृत्तीनंतर आता चर्चा रंगणार ती पर्थपासून अॅडलेडपर्यंत आणि जोहान्सबर्गपासून एजबॅस्टनपर्यंतच्या सर्वोतम शतकांची…खेरीज 2014-15 सालचा ऑस्ट्रेलिया दौरा ते 2018 मधील इंग्लंडविरुद्धची मालिका यांच्यावरही विश्लेषकांचं लक्ष केंद्रीत झालेलं असेल…
कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच अॅडलेड कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतकं (115 व 141) नोंदविणारा विराट कोहली 2019-20 पासून मात्र घसरत गेला. वैशिष्ट्यापूर्ण बाब म्हणजे त्याची बाद होण्याची पद्धत एकाच प्रकारची राहिली (ऑफ स्टम्पवरील वा बाहेरच्या चेंडूचा पाठलाग करण्याच्या नादात झेल देऊन बसणं. त्याचा लाभ प्रतिस्पर्धी संघांतील गोलंदाजांनी व्यवस्थित उठवायला सुरुवात केली. शिवाय त्याच्या उणिवा सातत्यानं उघड्या पडल्या त्या रशिद खान, अॅडम झॅम्पासारख्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांसमोर) ऑस्ट्रेलियात फलंदाजी करणं त्याला नेहमी फार आवडायचं नि तोच त्याचा शेवटचा दौरा देखील ठरला…2024-25 मोसम आठवतोय ?…बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 10 कसोटींत त्यानं 22.47 धावांच्या सरासरीनं काढल्या त्या केवळ 382 धावा. त्यामुळंच 50 चा टप्पा ओलांडलेली सरासरी निवृत्तीच्या वेळी पोहोचली ती 46.85 वर. ही सरासरी आणखी घसरण्यापासून थोडंफार वाचविलं ते कांगारुविरुद्धच्या नाबाद 100 धावांनी…कोहलीला (30 शतकं) शेवटपर्यंत तेंडुलकरचा 51 कसोटी शतकांचा व सुनील गावस्करांच्या 34 शतकांचा विक्रम मोडणं शक्य झालं नाही…
एक वर्तुळ पूर्ण झालंय हे खुद्द विराट कोहलीलाही कळलेलं असावं आणि त्यानं निर्णय घेतला तो कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा. विश्वाला ‘आयपीएल’ची देणगी देणाऱ्या देशात कसोटी क्रिकेटचं दर्शन घ्यायला प्रेक्षक उत्साहानं यायचे ते प्रामुख्यानं विराटची फलंदाजी पाहण्यासाठीच आणि तो देखील आपलं सर्वस्व पणाला लावायचा…रोहित शर्मा यापूर्वीच निवृत्त झालाय आणि आता त्याच मार्गानं चालणं विराटनं सुद्धा पसंत केलंय. त्यामुळं येऊ घातलेल्या काही दिवसांत भारतातील कसोटी क्रिकेटची लोकप्रियता घसरल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये…आता विराट कोहलीच्या ‘फिदा’ करणाऱ्या फलंदाजीचं, त्याच्या हुकमी फटक्यांचं दर्शन घडण्यासाठी वाट पाहावी लागेल ती एकदिवसीय सामन्यांची !
विराटच्या कारकिर्दीचे टप्पे…
विराट कोहली हा कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर (15921 धावा), राहुल द्रविड (13265 धावा) आणि सुनील गावस्कर (10122 धावा) यांच्यानंतर 9230 धावांनिशी चौथ्या क्रमांकावर विसावलाय…
- 2011-12 : विराटनं कसोटी पदार्पण केलं ते जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध. परंतु त्या पहिल्या कसोटी दौऱ्यात पाच डावांमध्ये फक्त 76 धावा काढता आल्यानं मोठी निराशा झाली. मात्र तऊण विराटनं आगामी काळात काही जबरदस्त खेळी करून नाव कमावलं…त्याचा उदय खऱ्या अर्थानं झाला तो 2012 मध्ये अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविऊद्ध झळकावलेल्या पहिल्या शतकानं. त्यात त्यानं 213 चेंडूंत 116 धावा फटकावल्या. त्या दौऱ्यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण नि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांना पछाडताना त्यानं चार कसोटींमध्ये सर्वाधिक 300 धावा केल्या…
- 2011 ते 2015 : 41 कसोटींमध्ये 44.03 च्या सरासरीने जमविल्या त्या 2994 धावा केल्या. या 72 डावांमध्ये समावेश राहिला तो 11 शतकं व 12 अर्धशतकांचा…
- 2016 ते 2019 : कोहलीच्या कारकिर्दीचं शिखर म्हणता येणारा कालखंङ…त्यानं 43 कसोटी सामन्यांमध्ये 66.79 च्या सरासरीनं फटकावल्या त्या 4208 धावा अन् 69 डावांमध्ये नोंदविली ती तब्बल 16 शतकं तसंच 10 अर्धशतकं. त्यात नाबाद 254 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या. विराटनं जागतिक विक्रम नोंदविणारी सात द्विशतकं खात्यात जमा केली ती याच काळात…
- 2020 नंतर : या सुपरस्टार फलंदाजाची समीकरणं गडबडण्यास सुरुवात झाली अन् 39 कसोटी सामन्यांमध्ये त्याला 30.72 च्या सरासरीनं भर टाकता आली ती फक्त 2028 धावांची. 69 डावांमध्ये केवळ तीन वेळा त्याला शतकाचा स्तर गाठता आला आणि नऊ अर्धशतकं झळकावता आली…त्यातल्या त्यात त्याच्या आकडेवारीला सावरलं ते 2023 च्या चांगल्या कामगिरीनं. त्या वर्षात आठ कसोटींत त्यानं 55.91 च्या सरासरीनं फटकावल्या 671 धावा आणि 12 डावांमध्ये अंतर्भाव राहिला तो दोन शतकं नि दोन अर्धशतकांचा…


– राजू प्रभू









