कंपनी प्रकल्प उभारणीच्या तयारीत : दरवर्षी पाच लाख ईव्ही वाहन उत्पादनांचे कंपनीचे ध्येय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एलॉन मस्क यांची ईव्ही वाहन उत्पादक कंपनी भारतीय बाजारपेठेत 20 लाख रुपयांच्या किमतीत इलेक्ट्रिक वाहन आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी भारतात ईव्ही तयार करण्यासाठी प्रकल्पाची स्थापन करणार आहे. दरवर्षी 5 लाख इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. परंतु, अद्याप टेस्लाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. टेस्लाला भारतात पुरवठा साखळी स्थापन करायची आहे. टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. काही अभ्यासकांच्या मते, कंपनीला देशात स्वत:ची इलेक्ट्रॉनिक पुरवठा साखळी स्थापन करायची आहे आणि कर सूट मिळवायची आहे. कंपनीला देशातील विद्यमान ऑटो घटक पुरवठा साखळीचे मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर, अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही टेस्लाला त्यांच्या गरजा विचारल्या आहेत आणि त्यांना भारतीय इकोसिस्टममधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, कंपनीचे स्वत:चे पुरवठादार आहेत. सुरुवातीच्या चर्चेत याविषयी चर्चा झाली आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की कंपनी यावर विचार करेल आणि याबाबतीत आवश्यक ती प्रगती करेल.
टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी घेतली माहिती
अलीकडेच, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या दिल्लीतील बैठकीत, टेस्लाने सांगितले की ते स्वत:चे पुरवठादार भारतात आणू इच्छित आहेत. या सोबतच या बैठकीत टेस्ला इंडियाच्या अधिकाऱ्यांनी भारतात त्यांचा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाची माहिती घेतली आहे. यानंतरच एकंदर भारतातील आगमनाची तयारी वेग घेऊ शकणार आहे.
पंतप्रधान मोदी-टेस्लाचे मस्क यांची भेट
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यानंतर मस्क म्हणाले, ‘सौर-पवन ऊर्जेमुळे भारतामध्ये शाश्वत उर्जेच्या भविष्यासाठी चांगली संधी आहे. मी मोदींचा चाहता आहे, लवकरच टेस्ला भारतात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले होते.









