वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी कंपनी टेस्ला भारतात पाय ठेवण्यासाठी तयार झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेस्लाने पुण्यामध्ये 11.65 लाख रुपये प्रति महिन्याला भाडे तत्त्वावर ऑफिस घेतले आहे. 1 ऑक्टोबरपासून टेस्ला या ऑफिसचे भाडे भरणार असल्याची माहिती मिळाली आहे. टेस्लाचे वरिष्ठ अधिकारी भारतात दाखल झाले असून सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी या नावाने भारतामध्ये कंपनी व्यवसाय करणार असल्याचे समजते. अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्लाने पुण्यातील विमाननगर भागात आपले नवे ऑफिस थाटण्याचे निश्चित केले आहे. पंचशिल बिझनेस पार्कमध्ये पहिल्या मजल्यावर 5850 चौरस फुटाचे ऑफिस कंपनीने भाडेतत्त्वावर घेतले असल्याचे सांगितले जात आहे.









