वृत्तसंस्था / दामास्कस
सुन्नीपंथिय इस्लामी दहशतवादी संघटनांकडून सीरियात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केला जात असून त्यांनी शहरांमागून शहरे ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला आहे. या देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि हुकुमशहा बशर अल आसद यांना सत्तेवरुन दूर करण्याचा या संघटनांचा निर्धार असून या देशाचा ताबा लवकरच आसद यांच्याकडून या संघटनांकडे जाईल, अशी शक्यता निर्माण झाला आहे.
सीरिया सरकारचे अधिकृत सैन्य आणि दहशतवादी बंडखोर यांच्यात या देशाच्या अनेक शहरांमध्ये तुंबळ रणकंदन होत आहे. शनिवारी बंडखोरांनी दारा नामक महत्वाच्या शहराचा ताबा घेतला आहे. त्यांच्या हाती पडलेले हे सहावे मोठे शहर आहे. आता राजधानी दामस्कससह केवळ आणखी चार शहरे आणि 20 हून अधिक मध्यम शहरे आसद यांच्या हाती उरली आहेत. बंडाखोर आता राजधानी दामास्कसच्या नजीक पोहचले असून ते कोणत्याही क्षणी राजधानीत प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारी सैनिकांचा प्रतिकार तोकडा पडत आहे, असे वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. दारा शहर हे क्रांतीचा पाळणा म्हणून ओळखले जाते. कारण या शहरामधून या देशात अनेकवेळा परिवर्तनाचे वारे निर्माण झाले आहे. 2011 मध्ये याच शहरात सीरियातील गृहयुद्धाचा प्रारंभ झाला होता. हे शहर जॉर्डन या देशाच्या सीमेवर असल्याने महत्वाचे आहे.
हिजबुल्लाचा हस्तक्षेप
आसद हे शिया पंथाचे असून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिया बहुल इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने प्रयत्न चालविला आहे. हिजबुल्लाचे एक छोटे दल लेबेनॉनमधून सीरियात पाठविण्यात आले आहे. तथापि, या दलाला अद्याप यश आलेले नाही, असे दिसत आहे. बंडखोरांच्या संघटनेचे प्रमुख हसन अब्देल घनी यांच्या म्हणण्यानुसार येत्या काही महिन्यांमध्येच संपूर्ण सीरियाचा ताबा बंडखोरांकडे जाणार आहे.









