ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमध्ये प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी मुंबईत दाखल झाला आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायकअसू शकतो. त्यामुळे सतर्क राहा, अशा सूचना राष्ट्रीय तपास यंत्रणेने मेलद्वारे मुंबई पोलिसांना केल्या आहेत.
सरफराज मेमन असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील इंदौरचा असल्याची माहिती आहे. एनआयएने मध्यप्रदेश पोलिसांनाही यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच संबंधिताची ओळख पटावी, यासाठी एनआयएने मुंबई पोलिसांना केलेल्या मेलमध्ये त्याचे लायसन्स, व्हिसा आणि आधार कार्डची प्रतही पाठवली आहे. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचेही या मेलमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, एनआयएच्या या मेलनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असून, त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्वाची सरकारी कार्यालये याठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या