मोठ्या हल्ल्याचा कट सैन्याने उधळला : मोठ्या प्रमाणात दारू गोळा अन् अमली पदार्थ जप्त
वृत्तसंस्था/ पुंछ
जम्मू-काश्मीरच्या करमारा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. हे तिन्ही दहशतवादी 30 मे रोजी रात्री खराब हवामान अन् पावसाचा लाभ घेत भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सैनिकांनी तारेचे कुंपण ओलांडणाऱ्या या तिन्ही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार करत त्यांना रोखले होते.
या दहशतवाद्यांकडून 10 किलो आयईडी, एके-56 रायफल समवेत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा सैन्याने हस्तगत केला आहे. गोळीबारात जखमी एका दहशतवाद्यावर पुंछ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दहशतवाद्यांना जेरबंद केल्यावर संबंधित क्षेत्रात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
पुंछच्या गुलपूर भागातील करमारा गावामध्ये नियंत्रण रेषेवर सैन्याला संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. यानंतर पहाटे सुमारे 4 वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. सैन्याकडून होणारी कारवाई पाहता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी जखमी झाला. तसेच एक सैनिकही या चकमकीत जखमी झाला आहे.
मोहम्मद फारुख (26 वर्षे), मोहम्मद रियाज (23 वर्षे) आणि मोहम्मद जुबैर (22 वर्षे) अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व दहशतवादी करमारा गावचेच रहिवासी आहेत. यातील फारुखच्या पायाला गोळी लागली आहे. या तिन्ही दहशतवाद्यांना सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs अन् अमली पदार्थांची खेप मिळाली होती. याची तस्करी करू पाहणाऱ्या या तिन्ही दहशतवाद्यांना सैनिकांनी ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांकडून एके रायफल, दोन पिस्तुल, 6 ग्रेनेड, प्रेशर कुकरमध्ये पेरण्यात आलेला आयईडी आणि हेरॉइनची 20 पाकिटे हस्तगत करण्यात आली आहेत.
सैन्याकडून आयईडी नष्ट
दहशतवाद्यांकडून हस्तगत 10 किलो वजनाची स्फोटके सैन्याने सुरक्षित पद्धतीने नष्ट केली आहेत. तत्पूर्वी मागील आठवड्यात गुरुवारी सुरक्षा दलांनी बारामुल्ला येथे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मृत दहशतवाद्यांकडून दारूगोळा हस्तगत झाला होता.









