ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांची महाराष्ट्र एटीएसकडून चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान, हे दशतवादी राहत असलेल्या कोंढव्यातील घरात एटीएसला एक कागद मिळाला आहे. दहशतवाद्यांनी घरातील पंख्याच्या पाईपमध्ये हा कागद लपवून ठेवला होता. या कागदावर बॉम्ब बनविण्याची माहिती होती.
18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड भागात दुचाकी चोरत असताना युनस साकी आणि इम्रान खान या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी ते राहत असलेल्या कोंढवा परिसरातील घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरातून काही जिवंत काडतुसे आणि ड्रोन बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. 25 जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली होती.
तपासादरम्यान, एटीएसकडून पुन्हा हे दहशतवादी राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घरातील फॅनच्या पाईपमध्ये एक कागद आढळून आला. त्यावर बॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया या दोघांनी हाताने लिहिलेली होती. या कागदासोबत ऍल्युमिनीअम पाईप बल्बच्या फिलॅमेंटस आणि दोन बंदुकीच्या गोळ्या देखील या ठिकाणी आढळून आल्या.








