ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचा फोटो आढळला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर नरिमन हाऊस असल्याची चर्चा आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, नरिमन हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
पुण्याच्या कोथरुड परिसरात 19 जुलैला इम्रान युनूस खान आणि युनूस याकूब साकी या दोन संशयितांना पकडण्यात आले होते. हे दोघे एनआयएच्या मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये होते. दोघेही राजस्थानमधील रतलामचे रहिवासी असून, ते कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. पुणे पोलिसांनी या दोघांकडून जिवंत काडतुसांसह ड्रोन बनवण्याचे सामान जप्त केले होते. सध्या या दोघांचा ताबा एटीएसने घेतला आहे. एटीएसच्या तपासात या दोघांकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचा फोटो आढळून आला. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. नरिमन हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, हे दोन्ही दहशतवादी इसिसकडून प्रेरित असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. जयपूर येथे स्फोट घडवण्याचा कट रचण्याचा आरोपही या दोघांवर आहे.









