संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ‘सिंदूर’संबंधी विधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन मारण्याचे घृणित कृत्य केले आहे. तथापि, आम्ही दहशतवाद्यांना, त्यांचा ‘धर्म’ पाहून नव्हे, तर ‘कर्म’ पाहून ठोकले आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. पहलगाम हल्ल्याला 22 ऑगस्टला चार महिने पूर्ण झाले आहेत. 7 मे 2025 या दिवशी भारताने या हल्ल्याचा सूड उगविताना पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करुन असंख्य दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर पाकिस्तानाचे 11 वायुतळही नष्ट केले होते.
भारताने केलेली ही कार्यवाही ‘सिंदूर अभियान’ या नावाने परिचित आहे. हे अभियान यशस्वी केल्यामुळे राजनाथ सिंह यांनी भारताच्या सेनादलांची प्रशंसा केली आहे. आमच्या सेनादलांनी दहशतवाद्यांना त्यांचा धर्म विचारात घेऊन नाही, तर कर्म विचारात घेऊन कठोर शिक्षा दिली. असे करून त्यांनी आपल्या उच्च विचारसरणीचा परिचय जगाला करून दिला, अशी भलावण त्यांनी केली.
वसुधैव कुटुंबकम्
‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची संस्कृती आहे. सारे जग हे एक कुटुंब असून त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाशी शांततेचा व्यवहारच केला पाहिजे, हे भारताचे तत्वज्ञान आहे. आम्ही माणसा-माणसांमध्ये धर्म किंवा वंशाच्या आधारावर भेदाभेद करीत नाही. तथापि, दहशतवाद्यांनी मात्र, धर्म विचारून निरपराध्यांच्या आणि नि:शस्त्रांच्या हत्या केल्या. हे त्यांच्यामधील आणि आमच्यामधील अंतर आहे. आम्ही आमची संस्कृती आणि आमचे तत्वज्ञान कठीण समयीही जपले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. एका कार्यक्रमात भाग घेताना त्यांनी हे विचार व्यक्त केले.
सहा विमाने पाडली
‘सिंदूर अभियाना’त भारताच्या वायुदलाने पाकिस्तानची सहा युद्धविमाने पाडविली. भारतीय वायुक्षेत्राचा भंग न करता, भारताच्याच वायुक्षेत्रात राहून आम्ही पाकिस्तानची सहा युद्धविमाने 300 किलोमीटर अंतरावरून उडविली. तसेच पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ आणि 11 वायुतळ उद्ध्वस्त केले, अशी माहिती भारताच्या वायुदल प्रमुखांनी नंतर दिली होती. राजनाथ सिंह यांनी या माहितीचा पुनरुच्चार आपल्या भाषणात केला. पाकिस्तानने पुन्हा असले दु:साहस केल्यास त्या देशाला याहीपेक्षा मोठा धडा शिकविला जाईल, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.
सभ्य देशांशीच संवाद शक्य
पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादापासून दूर होणार नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणताही संवाद केला जाऊ शकत नाही. सुसंस्कृत देशांशीच आम्ही बोलणी किंवा वाटाघाटी करु शकतो. दहशतवादाची भाषा ही भय, रक्तपात आणि द्वेषाचीच असते. अशा स्थितीत संवाद साधता येत नाही, ही भारताची भूमिका त्यांनी पुन्हा विशद केली. गोळ्यांच्या वर्षावात संवादाची मुस्कटदाबी होते. त्यामुळे सध्या पाकिस्तानशी संवाद शक्य नाही, असे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.









