पुणे / वार्ताहर :
सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱया झुल्फीकार अली बडोदावाला (रा. ठाणे) याला मंगळवारी एटीएसने ताब्यात घेतले. बुधवारी त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर.कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात असता, न्यायालयाने आरोपीला 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घातपातप्रकरणी एटीएसने चारजणांना अटक केली आहे. या गुन्हय़ात बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. कोथरूड येथे दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ते एनआयए शोध घेत असलेले दहशतवादी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या दोघांचा ताबा एटीएसने घेतल्यानंतर दोघांनी पुणे आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट केल्याचे उघडकीस आले. या दोघांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय 32 रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत करणारा मेकॅनिकल इंजिनीअर सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27) याला अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात बडोदावाल्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. झुल्फीकार अली बडोदावाला याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकीला मदत केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एटीएसने त्याला एनआयएच्या गुन्ह्यातून वर्ग केला आहे.








