10 वर्षांपूर्वी पाटण्यातील सभेत झाले होते स्फोट
वृत्तसंस्था/ दरभंगा
पाटण्यातील गांधी मैदानात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदींच्या सभेत झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी एसटीएफने एका दहशतवाद्याला अटक केली आहे. एसटीएफ टीमने दरभंगा येथे शनिवारी रात्री उशिरा छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान एसटीएफने मेहरे आलम या दहशतवाद्याला अटक केली आहे. एनआयएने यापूर्वी आलम याला अटक करत चौकशीसाठी मुजफ्फरपूर येथे नेले होते, परंतु त्यावेळी तो फरार झाला होता. यानंतर मेहरे आलम याच्या विरोधात एनआयएने गुन्हा नोंदविला होता. तर सभेतील स्फोटाप्रकरणी अनेक दोषींना यापूर्वीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटण्यातील सभेदरम्यान अनेक स्फोट झाले होते. या स्फोटात 6 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 82 जण जखमी झाले होते. याप्रकरणी मेहरे आलम हा आरोपी होता.









