भारतातील 3 मोठ्या हल्ल्यांचा होता सूत्रधार
वृत्तसंस्था/ कराची
भारतात अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणारा गुन्हेगार अन् लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिदची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हत्या करण्यात आली आहे. ही हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली असल्याचे समजते.
सैफुल्लाह खालिद हा भारतात घडवून आणण्यात आलेल्या तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. यात रामपूर येथे 2001 साली सीआरपीएफ तळावरील हल्ला, बेंगळूर येथे 2005 साली भारतीय विज्ञान काँग्रेसवरील (आयएससी) हल्ला आणि नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयावर 2006 साली झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे.
सैफुल्लाह खालिदने विनोद कुमार या खोट्या नावाने नेपाळमध्ये अनेक वर्षांपर्यंत वास्तव्य केले होते. या नावाने त्याने अनेक बनावट ओळखपत्रंही तयार करवून घेतली होती. त्याने एक स्थानिक महिला नगमा बानोशी विवाह देखील केला होता. नेपाळमधून तो लष्कर-ए-तोयबासाठी कारवायांचे समन्वय करत होता, भरती आणि लॉजिस्टिक सपोर्टमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होता. परंतु तरीही तो स्वत:ला लो-प्रोफाइल ठेवून होता.
अलिकडेच पाकिस्तानात स्थलांतर
खालिदने अलिकडेच स्वत:चे ठिकाण बदलले होते. तो पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या बदीन जिल्ह्यातील मतली येथे स्थलांतरित झाला होता. ते तो लष्कर-ए-तोयबा आणि त्याची मुखवटा संघटना जमात-उद-दावासाठी काम करत राहिला, त्याचे मुख्य लक्ष दहशतवाद्यांची भरती आणि निधी गोळा करण्यावर होते. परंतु अज्ञात हल्लेखोरांनी त्याला तेथेही शोधून काढले आणि ठार केले आहे.









